चित्रमय चरित्रातून राजाराम महाराज यांना मानाचा मुजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:24 AM2021-04-11T04:24:34+5:302021-04-11T04:24:34+5:30
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या निधनानंतर त्यांचे कार्य पुढे नेणारे व आधुनिक कोल्हापूरचे जनक छत्रपती राजाराम महाराज ...
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या निधनानंतर त्यांचे कार्य पुढे नेणारे व आधुनिक कोल्हापूरचे जनक छत्रपती राजाराम महाराज यांचे चित्रमय चरित्र ३१ मे या त्यांच्या राज्याभिषेकदिनी प्रकाशित होत आहे. यानिमित्ताने राजाराम महाराजांचे झाकोळलेले कार्यकर्तृत्व छायाचित्र आणि दस्तावेजाच्या रूपात पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानच्या विकासासाठी केलेले अतुलनीय कार्य सर्वलौकिक आहे. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करून आजचे हे सर्वार्थाने विकसित झालेले कोल्हापूर बहाल केले ते राजाराम महाराजांनी. राधानगरी धरणाचे काम पूर्ण करणे, तेथे वीजनिर्मिती केंद्र, शहरात बाजारपेठा, व्यापारी, औद्योगिक वसाहती निर्माण करणे, विविध पाणी पुरवठा योजना, विमानतळ, कोल्हापूर मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर होण्यासाठी केलेली मोलाची मदत स्टुडिओची स्थापना, शैक्षणिक संस्था व शाहू महाराजांनी बनवलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, अशी अनेक कार्ये राजाराम महाराजांनी केली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाहूंचे कार्य दस्तावेजाच्या स्वरूपात राहावे यासाठी अण्णासाहेब लठ्ठे यांच्याकडून त्यांनी इंग्रजी भाषेत त्यांचे चरित्र लिहून घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहूंचे ऋणानुबंधही पुढे जपले. अंबाबाईसह सर्व मंदिरांमध्ये प्रवेश मिळण्यासाठीच्या शाहू महाराजांनी केलेल्या कायद्याची अंंमलबजावणी अशी अगणित कार्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी केली. मात्र, त्यांच्या कार्याची दखल इतिहासाने फारशी घेतली नाही. या पुस्तकाच्या रूपाने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यात आला आहे.
---
२०१४ पासून संशोधन
राजाराम महाराज यांचे कार्य प्रकाशात आणण्यासाठी २०१४ पासून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत व डॉ. देविकाराणी पाटील यांनी संशोधनास सुरुवात केली. नव्या पिढीला छायाचित्रे पाहिल्यानंतर राजाराम महाराज कळावेत यासाठी छायाचित्र संकलन करू लागले. या कामात त्यांना माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह अमित आडसूळ, पुराभिलेख विभागाचे गणेश खोडके, ओंकार कोळेकर, राम यादव यांचे सहकार्य लाभले.
--
राजारामपुरीच्या छायाचित्रासाठी आवाहन
श्री राजाराम छत्रपती चित्रमय चरित्र या २४८ पानी पुस्तकात त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देणाऱ्या त्यांच्या काळातील छायाचित्रांचा समावेश आहे. केवळ राजारामपुरी वसाहतीचे जुने छायाचित्र न मिळाल्याने पुस्तकात अलीकडच्या काळातील छायाचित्र घ्यावे लागले. नागरिकांकडे जुनी छायाचित्रे उपलब्ध असतील, तर त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
छत्रपती राजाराम महाराजांचे कार्य कायमच झाकोळले गेले. बोटावर मोजण्याइतकी त्यांची पुस्तके उपलब्ध असून, त्यातही संशोधनाचा अभाव आहे. आधुनिक कोल्हापूरची सगळी सुखं उपभोगतानाही राजाराम महाराजांनी दिलेली देणगी आहे याची कृतकृत्य भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे. म्हणूनच त्यांचा इतिहास सर्वांसमोर यावा या प्रयत्नातून हे चरित्र आकाराला आले आहे.
इंद्रजित सावंत (इतिहास संशोधक)
--
फोटो नं १००४२०२१-कोल-राजाराम महाराज
---