शेतकरी संघाचा कारभार विनाव्यवस्थापक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:16+5:302021-05-27T04:26:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : शेतकरी संघाचा कारभार विनाव्यवस्थापकच सुरू आहे. संचालक मंडळाने प्रभारी व्यवस्थापक म्हणून सचिन सरनोबत यांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : शेतकरी संघाचा कारभार विनाव्यवस्थापकच सुरू आहे. संचालक मंडळाने प्रभारी व्यवस्थापक म्हणून सचिन सरनोबत यांची नियुक्ती केली, मात्र आप्पासाहेब निर्मळ यांनी अद्याप पदभार सोडला नाही आणि त्यातही ते रजेवर गेल्याने गेली १५ दिवस संघाचे कामकाज काहीसे ठप्प झाले आहे.
शेतकरी संघाचे मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ हे सेवानिवृत्त होऊन दीड वर्षे झाले आहे. संघाच्या धोरणानुसार अनुभवी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही कामावर कायम ठेवण्याचे धोरण असले तरी जबाबदार पदावर मात्र त्यांना राहता येत नाही. मात्र निर्मळ गेली दीड वर्षे मुख्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. या कालावधीत संघातील अनेक प्रकरणे उघडकीस आल्याने संचालक मंडळात दुफळी पडली. निर्मळ यांना व्यवस्थापक पदावरून बाजूला करण्याचा ठराव संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आला. त्यानंतर निर्मळ यांना चिटणीस म्हणून जबाबदारी देत त्यांच्या ठिकाणी सचिन सरनोबत यांची नियुक्ती करत त्यांना कार्यकारी संचालक पदाचे सर्व अधिकारी देण्यात आले. त्याशिवाय अजिंक्य प्रकाश डांगे यांच्यावर सहाय्यक चिटणीस, धनाजी देसाई यांच्याकडे इन्चार्ज चिफ अकाउंटंट तर सुगंधा सुभाष पारळे यांच्याकडे अकाउंटंट म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
मात्र निर्मळ यांनी सरनोबत यांच्याकडे रितसर पदभार न सोपवता ते रजेवर गेले आहेत. त्यामुळे गेली १५ दिवस संघाच्या कामकाजावर काहीसा परिणाम झाला आहे. निर्मळ यांनाच पुन्हा व्यवस्थापक पदावर ठेवण्यासाठी दोन संचालक आग्रही असल्याचे समजते. मात्र बहुतांशी संचालक येथे सेवानिवृत्त व्यक्ती नकोच, यावर ठाम आहेत.