सराफ संघाचा कारभार ‘चोख’ करणार
By admin | Published: November 19, 2014 10:44 PM2014-11-19T22:44:30+5:302014-11-19T23:25:21+5:30
नावलौकिक परत मिळविण्यासाठी प्रयत्न : सुरेश गायकवाड--थेटसंवाद
कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांची शिखरसंस्था असलेल्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे कामकाज गेल्या वर्षभरापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. वादविवाद, आरोप-प्रत्यारोपानंतर झालेल्या निवडणुकीत संघाच्या अध्यक्षपदी सुरेश गायकवाड निवडून आले आहे. संघाच्या नावलौकिकास बाधा, खालावलेली आर्थिक स्थिती, कोल्हापूरच्या सराफ बाजारपेठेसमोरील प्रश्न आणि त्यावरील उपाययोजना या विषयांवर त्यांच्याशी साधलेला थेट संवाद..
प्रश्न : संघाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही कोणत्या कामांना प्राधान्य देणार आहात ?
उत्तर : सराफ संघाच्यावतीने १९८९ मध्ये करवीरनिवासिनी अंबाबाईची चांदीची मूर्ती बनविण्यात आली आहे. ती समारंभपूर्वक देवस्थान समितीकडे सुपूर्त करण्याला आधी प्राधान्य देईन. चोरांनी पळवलेले दागिने सराफांना विकल्यानंतर पोलीस तपासादरम्यान सराफांना नाहक त्रास आणि भुर्दंड सोसावा लागतो, अशी प्रकरणे आधी संघाच्या समितीकडे यावीत, सराफाने दागिने खरेदी केल्याचे मान्य केल्यानंतर पुढील कारवाई व्हावी, यासाठी आम्ही गृहमंत्री, पोलीस प्रशासनाकडे मागणी करणार आहोत. अलीकडचा अनुभव पाहता भविष्यात संघाच्या कोणत्याही अध्यक्षाने मनमानी कारभार करू नये, यासाठी घटना दुरुस्ती करण्यात येणार आहे. शिवाय अध्यक्षांचा कालावधी तीन वर्षे करण्यात येणार आहे.
उत्तर : संघाची जागा कायमस्वरूपी भाड्याने दिल्याबद्दल तुमच्यावरही आरोप झाले आहेत?
उत्तर : सोनाली ड्रेसेस हे आमचे खूप जुने कूळ आहे. त्यांचा व्यवसाय चालेनासा झाला म्हणून त्यांनी भागीदारी केली. त्यामुळे १० लाख रुपये आणि साडेसहा हजार रुपये भाडे घेऊन त्यांच्याशी करार करण्यात आला, त्यावेळी सोनालीच्या मालकांनी जोपर्यंत मी कपड्यांचा व्यवसाय करेन, तोपर्यंत ही जागा मलाच भाडेतत्त्वावर द्यावी, अशी मागणी करून करारात तसे लिहून घेतले. त्यामुळे माझ्यावर आरोप झाले. मात्र, ‘सोनाली’च्या मालकांना मी ही चूक सांगितल्यानंतर त्यांना स्टॅम्पवर करार बदलून देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे हा प्रश्न आता मिटला आहे.
प्रश्न : संघाची आर्थिक स्थिती सध्या फारशी चांगली नाही, यातून मार्ग कसा काढाल?
उत्तर : संघाचे उत्पन्न वाढवणे हा विषय आमच्यासाठी ऐरणीवर आहे. त्यासाठी संघाच्या मालकीच्या इमारतीतील काही खोल्या सराफ व्यावसायिकांना लॉकर्सच्या रूपात देण्याचा विचार आहे. शिवाय अन्य खोल्या एखाद्या बँकेला भाड्याने देणार आहे. त्यामुळे संघाचे उत्पन्न वाढेल. शिवाय या दोन वर्षांत मोठे कार्यक्रम कमी करून काटकसरीने कामकाज करणार आहे. सराफ संघाची गंगाजळी पूर्ववत करण्यासाठीच सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. ब्रँडेड मार्केटच्या स्पर्धेत कोल्हापूरची सराफ बाजारपेठ वृद्धिंगत करण्यासाठी काय करणार आहात?
उत्तर : कोल्हापुरातील बहुतांशी सराफ व्यावसायिकांनी हॉलमार्कच्याच दागिन्यांना प्राधान्य दिल्याने ग्राहक आणि व्यापारी दोघांतही विश्वासाने व्यवहार होतो. टेंपल ज्वेलरी, सोन्याचे मणी, चांदीच्या मूर्ती, ठुशी, साज, हुपरीतील चांदी व्यवसाय ही कोल्हापूरच्या सराफ बाजाराची खास वैशिष्ट्ये आहेत. देशभरात असे अलंकार कुठेही घडविले जात नाहीत. सराफ व्यवसायात कोल्हापूरचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रदर्शने, मेळाव्याचे आयोजन करणार आहे. त्यात देशभरातील सराफ व्यावसायिकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय जेम्स अॅन्ड ज्वेलरी फेडरेशनच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.
प्रश्न : संघाचा नावलौकिक पुन्हा कसा वाढवाल ?
उत्तर : मी यापूर्वी केलेल्या चांगल्या कामांमुळेच तिसऱ्यांदा अध्यक्ष बनलो आहे. गेल्या वर्षभरात संघाची खूप बदनामी झाली आहे. यापूर्वीच्या कार्यकारिण़ीने केलेल्या चुका आणि वाद दोन्हीही आता उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे यापुढे सगळे प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवणार, सर्व सभासदांना बरोबर घेऊन त्यांच्या सहमतीने काम करणार आहे. संघाची पत आणि नावलौकिक पूर्ववत मिळवून देत, सराफांची प्रतिष्ठीत संस्था म्हणून संघाला शिखरसंस्थेचे स्थान प्राप्त करून देणार आणि मगच पुढच्या पिढीकडे संस्थेचे कार्य सुपूर्त करणार.
- इंदुमती गणेश