भ्रष्ट मार्गाने दिलेली बढती 'मनपा'ने रद्द करावी
By admin | Published: February 9, 2015 11:43 PM2015-02-09T23:43:08+5:302015-02-09T23:56:07+5:30
लोकमत हेल्पलाईन : के.एम.टी.च्या संजय भोसले यांच्या विरोधात रामाणे यांची तक्रार
कोल्हापूर : के.एम.टी.मधील एका पदाधिकाऱ्याने मलिदा मिळविण्यासाठी अकरा कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरतीद्वारे बढती दिली, परंतु औद्योगिक न्यायालयाने निवड प्रक्रिया रद्द केल्यानंतरही संजय शिवाजीराव भोसले या एकाच कर्मचाऱ्यास बढती दिली आहे. याबाबत संजय भोसले आणि तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी के.एम.टी.सह महासभेची दिशाभूल केली आहे. भ्रष्ट आणि गैरमार्गाने त्यांना दिलेली बढती रद्द करावी, अशी मागणी मनपाचे सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत दत्तात्रय रामाणे यांनी ‘लोकमत’ हेल्पलाईनकडे केली आहे. संजय भोसले यांना दिलेली बढती कशी चुकीची आहे, याबाबत आपण दिलेले पुरावे आणि कागदपत्रे खोटी निघाली, तर मी महापालिकेच्या सेवानिवृत्तीच्या वेतनावर पाणी सोडायला तयार आहे, आणि जर ती खरी असेल तर भोसले यांना तत्काळ सध्याच्या ‘रचना व कार्यपद्धती’ या पदावरून खाली खेचून लिपिकपदावर बसवावे, असे आव्हान रामाणे यांनी दिले आहे.
‘लोकमत हेल्पलाईन’शी बोलताना रामाणे म्हणाले, भोसले हे के.एम.टी.कडे लिपिक म्हणून नोकरीस लागले. पदवीधर नसलेल्या भोसले यांना नंतर अन्य अकरा कर्मचाऱ्यांसह अकौटंट म्हणून बढती दिली. त्यासाठी सरळ सेवा भरतीचा फार्स झाला. कालांतराने औद्योगिक न्यायालयाने ही निवड प्रक्रिया रद्द केली. उच्च न्यायालयानेही हाच आदेश कायम केला. दरम्यान, एका तत्कालीन उपायुक्तांच्या सहमतीने भोसले यांना औद्योगिक न्यायालयाच्या अंतिम आदेशास अधीन राहून मनपा ‘समकक्ष पदा’वर कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, असा ठराव महासभेत झाला. वास्तविक भोसले यांनी मनपा सेवेत बढती मिळत असताना न्यायालयाचा आदेश तसेच त्यांच्यावर झालेल्या ‘एम’ गुन्ह्याची माहिती लपवून ठेवली.
अकरापैकी दहा कर्मचारी आजही मूळ पदावर के.एम.टी.मध्ये काम करत आहेत. मग एकट्या भोसले यांनाच का बढती दिली, असा रामाणे यांचा प्रशासनाला प्रश्न आहे. भोसले यांना उपायुक्तपदापर्यंत बढती दिली तरी आपली हरकत नाही, पण न्यायालयाचा निर्णय डावलून बढती देण्याला आपला विरोध आहे, असे रामाणे म्हणतात. (प्रतिनिधी)
न्याय मिळेपर्यंत मनपा प्रशासनाविरुध्द लढणार
संबंधित उपायुक्त व संजय भोसले यांनी मनपाची फसवणूक केली आहे, असा रामाणे यांचा आरोप आहे. भोसले यांच्यावर ‘एम’ गुन्हा दाखल झाला, त्याचवेळी त्यांना निलंबित करणे आवश्यक होते. मात्र, सगळ्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घालून जर आयुक्त, प्रशासन धृतराष्ट्र, गांधारीची भूमिका घेणार असतील तर त्यांच्या विरोधात आपला लढा सुरुच राहील, असे चंद्रकांत रामाणी यांनी स्पष्ट केले.