‘गडहिंग्लज’मध्ये रंगले ‘मानापमान’ नाट्य !
By admin | Published: June 25, 2015 01:15 AM2015-06-25T01:15:31+5:302015-06-25T01:15:31+5:30
शशिकांत खोत बसले ‘बीडीआें’च्या खुर्चीवर : कर्मचारी सामुदायिक रजेवर; सदस्यांचा सभात्याग, बीडीओ कक्षाला ठोकले टाळे, हकालपट्टीची मागणी
गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच पदाधिकारी व अधिकारी यांच्यातील ‘मानापमान’ नाट्य रंगले. निमित्त झाले...जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत हे ‘बीडीओं’च्या खुर्चीवर बसल्याचे आणि कार्यालयात उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना उपस्थिती पुस्तिकेत स्वाक्षऱ्या करण्यास केलेल्या मज्जावाचे. या घटनेच्या निषेधार्थ सर्व कर्मचारी सामुदायिक रजेवर गेले, तर ‘बीडीओ’ चंचल पाटील या मासिक सभेस अनुपस्थित राहिल्याच्या निषेधार्थ निम्मे कामकाज संपल्यानंतर सभापतींसह सर्व पंचायत समिती सदस्यांनी सभात्याग केला.
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष खोत हे पशुसंवर्धन विभागाच्या एका बैठकीसाठी गडहिंग्लजला आले होते. त्यावेळी ते ‘बीडीओं’च्या खुर्चीवर बसले. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत त्यांनी कार्यालय अधीक्षकांकडे विचारणा केली. उपस्थिती पुस्तिका ताब्यात घेऊन उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना स्वाक्षरी करण्यास त्यांनी मज्जाव केला. त्यानंतर पशुसंवर्धनची बैठक सुरू झाली.
दरम्यान, सर्व कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजीने या प्रकाराचा निषेध केला. घोषणाबाजीच्या आवाजामुळे खाली येऊन पाहिल्यानंतर हा प्रकार सदस्यांच्या लक्षात आला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य जयकुमार मुन्नोळी, माजी सभापती अमर चव्हाण व पंचायत समितीचे सदस्य बाळेश नाईक यांनी या संदर्भात उपाध्यक्ष खोत आणि बीडीओ पाटील व कर्मचाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली.
सकाळी १०-१० नंतरच उपस्थिती पुस्तिका ताब्यात घेऊन उशिरा आलेल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे खोत यांनी सांगितले. जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा अवमान होऊ नये म्हणून घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले. मात्र, कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, पंचायत समितीची मासिक सभा सुरू झाली होती. सभेस उशिरा आल्याबद्दल चव्हाण व नाईक यांनी बीडीओंना जाब विचारला. त्यावेळी प्रकृती बरी नसल्यामुळे रजा घेतल्याचे सांगून त्या निघून गेल्या. सहायक गटविकास अधिकारी जगदाळे यांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज सुरू झाले. काही विभागांचा आढावा झाल्यानंतर सभापती अनुसया सुतार व उपसभापती तानाजी कांबळे यांच्यासह सर्व सदस्यांनी बीडीओंचा निषेध करून सभात्याग केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कक्षाला टाळे ठोकले व त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. बहुतेक सर्व कर्मचारी सामुदायिक रजेवर गेल्यामुळे दिवसभर पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट होता.
तहसीलदारांचा मध्यस्थीचा प्रयत्न
दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तहसीलदार हनुमंत पाटील हे ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात पंचायत समितीचे सदस्य व अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात आले. त्यावेळी सदस्यांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला व बीडीओंची बदली न झालेस सर्व सदस्य सामुदायिक राजीनामे देतील, असा इशाराही दिला. गडहिंग्लज पंचायत समितीचे कामकाज जिल्ह्यात व राज्यात आदर्श असल्यामुळे एकत्र बसून याप्रश्नी तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी सदस्यांना केले. मात्र, त्यांनी तडजोडीस नकार दिला.
बीडीओंच्या हकालपट्टीची मागणी
‘बीडीओं’ची कृती लोकप्रतिनिधींच्या अवमानाची असल्याचा आरोप करून त्यांच्या हकालपट्टीचा ठराव सभागृहात मांडण्यात आला. त्यानंतर पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्या कक्षाला टाळे ठोकले. ‘बीडीओं’ची उचलबांगडी करून त्यांचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवावा, अशी मागणी सभापती अनुसया सुतार व उपसभापती तानाजी कांबळे यांच्यासह सर्व सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)