मानाचे जग सौंदत्तीला रवाना, रेणुका देवीची ११ तारखेला मुख्य यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 04:21 PM2019-12-03T16:21:00+5:302019-12-03T16:23:24+5:30
‘उदं गं आई उदं..’चा गजर, फुलांचा वर्षाव, भंडाऱ्याची उधळण... सुती, घुमकं, चौंडकं, हलगीच्या कडकडाटांत फुलांनी सजलेले श्री रेणुकादेवीचे मानाचे जग सौंदत्तीसाठी रवाना झाले. देवीची यात्रा ११ तारखेला होत आहे.
कोल्हापूर : ‘उदं गं आई उदं..’चा गजर, फुलांचा वर्षाव, भंडाऱ्याची उधळण... सुती, घुमकं, चौंडकं, हलगीच्या कडकडाटांत फुलांनी सजलेले श्री रेणुकादेवीचे मानाचे जग सौंदत्तीसाठी रवाना झाले. देवीची यात्रा ११ तारखेला होत आहे.
कर्नाटकातील सौंदत्ती येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात श्री रेणुका देवीची यात्रा भरते. तीन दिवस चालणाºया या यात्रेत देवीचे कंकणविमोचन केले जाते, तो यात्रेचा मुख्य दिवस असतो. या यात्रेसाठी कोल्हापुरातून एक लाखावर भाविक जातात, तर यात्रेच्या आठ दिवस आधी कोल्हापुरातून मानाचे चार जग जातात.
सोमवारी सायंकाळी बिंदू चौकातील गजेंद्रलक्ष्मी मंदिर येथे फुलांनी सजलेल्या जगांचे हलगीसह वाद्यांच्या गजरात देवीची आरती झाली. फुलांच्या वर्षावात मानकऱ्यांनी हे जग डोक्यावर घेतले आणि ‘उदं गं आई उदं’चा गजर झाला.
ओढ्यावरील रेणुका मंदिराच्या मदनआई जाधव, बायाक्काबाई चव्हाण, लक्ष्मीआई जाधव हे तीन जग बिंदू चौकातून आझाद चौक, उमा टॉकीज, ओढ्यावरील गणेशमंदिरमार्गे पार्वती टॉकीज येथून एसटी बसेसमधून सौंदत्तीसाठी रवाना झाल्या. त्याआधी शिवाजीराव आळवेकर यांच्या जगाला निरोप देण्यात आला. कोल्हापुरातील भाविक सोमवार (दि. ९) पासून सौंदत्तीला जाणार आहेत. यात्रा संपल्यानंतर बुधवार (दि. ११) रात्रीच परतीचा प्रवास सुरू होईल.
ओढ्यावर पालखी
सौंदत्ती यात्रेदिवशी ओढ्यावरील रेणुका देवीचा पालखी सोहळा होणार आहे. ११ तारखेला सकाळी देवीचा अभिषेक होईल, त्यानंतर पूजा बांधली जाईल. सायंकाळी पाच वाजता पुन्हा देवीचा अभिषेक व रात्री नऊ वाजता पालखी सोहळा होईल. मानाचे जग १४ तारखेला पुन्हा कोल्हापुरात येतील, त्यानंतर आठ दिवसांत रेणुका देवीची आंबीलयात्रा होईल.