बंडात उठाव करणारा मानसिंग दुर्लक्षितच !
By admin | Published: September 8, 2015 09:55 PM2015-09-08T21:55:34+5:302015-09-08T21:55:34+5:30
फाशीचा वड : ‘जिज्ञासा’ने जागविल्या आठवणी
सातारा : १८५७ चे बंड म्हणजे भारतीय स्वातंत्रलढ्यातील एक महत्त्वाचे पर्व आहे. याचे कारण म्हणजे या क्रांतीत सहभागी असणाऱ्या १७ क्रांतिवीरांना जुलमी ब्रिटिश सरकारने मृत्युदंड दिला. तो दिवस होता ८ सप्टेंबर. येथील फाशीचा वड येथे जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेच्या वतीने हुतात्म्यांना अभिवान करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
या शहिदांची स्मृती चिरकाल रहावी म्हणून स्वातंत्रोत्तर काळात गेंडामाळ येथील फाशीचा वड येथे स्मारकही उभारण्यात आले आहे. वेळोवेळी त्या स्मारकाचे नूतनीकरणही करण्यात आले; परंतु ८ सप्टेंबर हा क्रांती दिवस मात्र विस्मृतीत गेल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.या क्रांतिकारकांमध्ये सर्व जातीचे लोक होते. आपल्या धेय्यासाठी जातिभेद विसरून त्यांनी मृत्यूला कवटाळले. या क्रांतिकारकांच्या नावांत, वेगवेगळ्या साधनांत मतांतरे अढळतात, त्यामुळे अस्सल साधनांचा अभ्यास करुन मूळ नावांचा शोध घेण्याचा मनोदय ‘जिज्ञासा’तील अभ्यासकांनी व्यक्त केला. शहिदांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी जिज्ञासाचे विक्रांत मंडपे, सागर गायकवाड, योगेश चौकवाले, नीलेश पंडित, शीतल दीक्षित तसेच नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्मारकावर हवा नामोल्लेख..
१८५७च्या बंडासाठी इंग्रजांची २२ वी पलटण फितूर करण्याची महत्त्वाची कामगिरी करणारा मानसिंग हाही एक क्रांतिकारक होता. जो फितुरीमुळे पकडला गेला व ताबडतोब १२ जून रोजी त्याल्या तोफेच्या तोंडी दिले गेले. परंतु कोणत्याही स्मारकावर त्याचा साधा नामोल्लेखही नाही, अशी खंत ‘जिज्ञासा’चे मार्गदर्शक गणपतराव साळुंखे यांनी व्यक्त केली.
असा दिला होता मृत्युदंडबंडातील नारायण पावसकर सोनार, केशव चित्रे, शिवराम कुलकर्णी, विठ्ठल कोंडी (वाकनीस), सीताराम गुप्ते यांना फाशी देण्यात आले. तसेच मुनाजी भांदिर्गे, सखाराम शेट्ये, बाब्या गायकवाड, येषां गायकवाड, गणेश कारखानीस, नाना रामोशी यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. रामजी चव्हाण, बाब्या शिरतोडे, नाम्या रामोशी, शिवाजी पाटोळे, पर्वती पाटोळे, पतालू येसू यांना गोळ्या घातल्या. गेंडामाळावरील फाशीचा वड येथे ही शिक्षा ठोठावण्यात आली. मृत्यूची शिक्षा देताना असा भेदभाव का हे न उलगडलेले कोडे आहे.