मंडलिक कारखाना बिनविरोधचे संकेत
By admin | Published: April 7, 2017 01:10 AM2017-04-07T01:10:18+5:302017-04-07T01:10:18+5:30
मंडलिक कारखाना बिनविरोधचे संकेत
दत्तात्रय पाटील ल्ल म्हाकवे
हमिदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या २०१७-२२ पंचवार्षिक निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, सद्यस्थितीमध्ये या कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक व या कारखान्यातील मुख्य विरोधक आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये राजकीय युती झाली आहे. तसेच, माजी आमदार संजय घाटगे यांना मानणारा सभासद वर्ग या कारखान्यात फारसा नाही. त्यामुळे कारखान्याची निवडणुक प्रक्रिया सध्या तरी बिनविरोध होणार हे निश्चित मानले जात आहे.
लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर या कारखान्याची ही पहिलीच निवडणुक आहे. ती बिनविरोध करुन त्यांना आदरांजली वाहूया अशी येथील मंडलिक प्रेमी जनतेची लोकभावना असून सर्वच नेतेमंडळीनी त्याचा आदर करावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. ९ आॅगस्ट १९९६ या क्रांतीदिनी हमिदवाडा साखर कारखान्याला मंजुरी मिळाली. प्रत्यक्षात १९९८-९९ या कारखान्याच्या उभारणीला प्रारंभ होऊन २००० मध्ये यशस्वी चाचणी गळित हंगाम घेण्यात आला. सदाशिवराव मंडलिक यांच्या मार्गदर्शन, कर्मचारी व कार्यकर्त्यांचे योगदान, शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे अल्पावधीतच कारखान्याचा आलेख चढता राहिला. काटेकोर आणि पारदर्शी कारभारामुळे उच्चांकी दराची परंपंरा, उत्कृष्ठ साखर उतारा यामुळे हा कारखाना नावारूपाला आला.
२००५ मध्ये मंडलिक-मुश्रीफ गटाची शकले पडली आणि त्याचे परिणाम २००७ मध्ये झालेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत उमटले. २००७ आणि २०१२ मध्ये झालेल्या दोन्ही निवडणुकात या दोन्ही गटात जोरदार घमासान झाले. ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रयत्न केले होते. मात्र, त्याला यश न आल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या दोन्ही निवडणुकांमध्ये सदाशिवराव मंडलिक यांनी सत्ता अबाधित राखली.
मंडलिक यांच्या निधनानंतर या कारखान्याची पहिलीच निवडणुक होत आहे. परंतु, नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या सभापती निवडीदरम्यान प्रा. मंडलिक व मुश्रीफांचे सुत जुळले आहे. तसेच आगामी विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीतही हे गट एकत्रित राहण्याचे संकेत आहेत. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत मुश्रीफ यांचा विरोध मावळला आहे. तसेच, भाजपाचे नेते समरजितसिंह घाटगे तसेच संजय घाटगे यांना मानणारा सभासद वर्ग या कारखान्यात फारसा नाही. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता या कारखान्याची निवडणुक बिनविरोधच्याा दिशेने मार्गक्रमण करत असून निवडणुक प्रक्रियेची केवळ औपचारिकता बाकी असल्याचेही जाणकारातून बोलले जात आहे.
मंडलिकांच्या कार्यकर्तृत्वाची अशीही पोचपावती
दूरदृष्टी लाभलेल्या सदाशिवराव मंडलिक यांनी अवर्षणग्रस्त असणाऱ्या वेदगंगा नदीकाठावरील गावांना १९९५ मध्ये काळम्मावाडीचे पाणी दूधगंगेतून वेदगंगेत आणि कच्च्या कालव्यातून सोडून हरितक्रांती साधली. या पाच वर्षांत तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले. त्यामुळे हमीदवाड्याच्या फोंड्या माळावर साखर कारखाना निर्मितीचा संकल्प केला. शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधली. कारखान्याच्या या प्रगतीचा लेखा-जोखा पाहून वसंतदादा इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडून राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार देऊन गौरविले. तसेच यावर्षी शासनाने दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज ‘वनश्री’ पुरस्कार देईन गौरविले आहे. मंडलिक यांच्या कार्यकर्तृत्वाची ही पोचपावतीच असल्याच्या प्रतिक्रियाही कार्यकर्त्यांच्या आहेत.
आॅगस्ट-सप्टेंबरमध्येच निवडणूक प्रक्रियेला पूर्णविराम
संस्था गटातील मतदार यादीचे ठराव देण्याची ६ एप्रिल ते ५ मे ही मुदत आहे, तर २४ जूनला प्राथमिक मतदार यादी तयार होणार आहे. गत महिन्यात जि. प. व पं. स. तसेच अन्य कारखान्यांच्या निवडणूक प्रक्रियेमुळे या कारखान्याच्या संचालक मंडळाला दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात या संचालक मंडळाची मुदत संपते. सध्या, प्रशासनाकडून या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बिनविरोध निवडणुकीमुळे ५० ते ६० लाख रुपयांचा अनावश्यक खर्च व कार्यकर्त्यांमधील हेवे दावे टाळता येणार असल्याचेही सांगितले. जाणकारांचे म्हणणे आहे.