मंडलिक गटाचे ६५ ठराव दाखल
By admin | Published: February 4, 2015 12:46 AM2015-02-04T00:46:26+5:302015-02-04T00:47:57+5:30
गोकुळ दूध संघ निवडणूक : आज शेवटचा दिवस; १९१ ठराव शिल्लक
कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक गटाचे कागल तालुक्यातील ठराव थेट सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयात दाखल केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक व कागलचे उपसभापती भूषण पाटील यांनी ६५ ठराव दाखल केले. जिल्ह्यातून मंगळवारी ४७७ ठराव दाखल झाले असून आज, बुधवारी ठराव दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी प्राथमिक मतदारयादी तयार करण्यासाठी संलग्न दूध संस्थांचे ठराव दाखल केले जात आहेत. सोमवारी विद्यमान संचालकांसह काही इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करत ठराव दाखल केले होते. आज तब्बल ४७७ ठराव दाखल झाले. सर्वाधिक १०२ ठराव राधानगरी तालुक्यातून दाखल झाले. अजून १९१ ठराव दाखल व्हायचे असून आज, बुधवारी ठराव दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. शिल्लक ठरावांमध्ये सर्वाधिक ठराव राधानगरी तालुक्यातील ६४ राहिले आहेत. त्यानंतर चंदगडमधील ३२, करवीरमधील २९ तर भुदरगडमधील १७ ठराव अजून दाखल व्हायचे आहेत. गडहिंग्लज १०, पन्हाळा १६, शाहूवाडी ९, कागल २, शिरोळ ४, हातकणंगले ३ व आजरा २ ठराव दाखल व्हायचे आहेत. (प्रतिनिधी)
दुबार ठरावधारकांवर कारवाई
सहकार प्राधिकरणाच्या सूचनेनुसार संस्थांनी आपला प्रतिनिधी देताना एकच देणे बंधनकारक आहे पण दाखल झालेल्या ठरावांमध्ये काही दुबार असल्याचे निदर्शनास आले आहेत, संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींना बोलावून घेऊन त्याची पडताळणी करणार असून चुकीची माहिती देणाऱ्यांवर फौजदारी दाखल करणार असल्याची माहिती विभागीय उपनिबंधक (दुग्ध) दिग्विजय राठोड यांनी दिली.
भूषण पाटील यांनी घेतली महाडिक यांची भेट
माजी खासदार सदाशिवराव मंडलिक गटाचे कट्टर समर्थक व उपसभापती भूषण पाटील यांनी सहायक निबंधक कार्यालयात ठराव दाखल केल्यानंतर ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात जाऊन आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली.
बाबा देसाई यांचेही
ठराव दाखल
भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई यांनी मंगळवारी आपल्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ठराव साहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल केले. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांची चर्चा झालेली आहे. मंत्री पाटील सांगतील त्याप्रमाणे पुढील निर्णय घेतला जाईल, असे देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मंगळवारी दाखल झालेले ठराव; कंसात एकूण
करवीर- ९० (५५५)
आजरा -७ (२१३)
भुदरगड - ७४ (३४१)
चंदगड - १८ (२९१)
कागल - ७० (३४८)
शाहूवाडी - ५६ (२३२)
शिरोळ - ० (११३)
पन्हाळा - १६ (२४९)
राधानगरी - १०२ (३५२)
गगनबावडा - १९ (६१)
हातकणंगले -४ (७३)
गडहिंग्लज -२१ (२४०)