मंडलिक गटाला सोबत घेणार

By Admin | Published: March 25, 2015 11:47 PM2015-03-25T23:47:43+5:302015-03-26T00:11:36+5:30

‘गोकुळ’चे राजकारण : राजेश पाटील यांना ‘सत्तारूढ’मधून संधी शक्य

With the Mandalik Group | मंडलिक गटाला सोबत घेणार

मंडलिक गटाला सोबत घेणार

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचा मुलगा राजेश पाटील यांना सत्तारूढ आघाडीतून संधी देऊन स्वर्गीय नेते सदाशिवराव मंडलिक यांच्या गटाला आपल्यासोबत घेण्याचा आमदार महादेवराव महाडिक यांचा प्रयत्न आहे. माजी आमदार पी. एन. पाटील यांचा, माजी आमदार दिनकरराव जाधव यांचा मुलगा सत्यजित याला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न आहे.
संघाच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी या वेळेला सर्वाधिक २५० जणांचे ३८३ अर्ज दाखल झाले आहेत. संघाच्या सत्तेची प्रत्येकालाच हाव सुटल्याचे ते निदर्शक आहे. त्यामुळे सत्तारूढ पॅनेलची रचना करताना नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. सोमवारी
(दि. २३) अर्ज दाखल करताना आमदार महाडिक यांनी नरसिंगराव पाटील यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना सोबत घेतले, याचा अर्थ ते त्यांच्या मुलग्यास उमेदवारी देणार हे नक्की मानले जात आहे. राजेश पाटील हे दिवंगत मंडलिक यांचे जावई. त्यांना उमेदवारी दिल्यास मंडलिक गट सत्तारूढ गटाबरोबर येईल, असा त्यांचा होरा आहे.
बाबासाहेब चौगले यांची सत्तारूढ गटातील जागा रिक्त झाली आहे. ही जागा चंदगडला देण्याचे घाटत आहे. सत्यजित जाधव यांच्यासाठी पी. एन. पाटील प्रयत्नशील आहेत; परंतु त्यांची ताकद तालुक्यापुरतीच मर्यादित आहे. उलट मंडलिक गट म्हणून त्यांचा प्रभाव केव्हाही जास्त आहे.
गेल्या निवडणुकीत मंडलिक-नरसिंगराव पाटील यांनी मदत केल्यामुळेच सत्तारूढ आघाडीला गुलाल लागला आहे.
माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ हे या निवडणुकीत एकत्र येऊन पॅनेल करणार का, याबद्दलही लोकांना उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज तरी भरले आहेत; परंतु मुश्रीफ यांनी सत्तारूढ आघाडीस दोन अटी घातल्या आहेत. एक तर अंबरीश घाटगे यांना उमेदवारी देऊ नका व दिली तर माझ्याही कार्यकर्त्याला (रणजित पाटील सोडून) पॅनेलमध्ये संधी द्या; परंतु या दोन्ही गोष्टींना पी. एन. पाटील यांचा विरोध होऊ शकतो. ‘राष्ट्रवादी’ने स्वतंत्र पॅनेल केले, तर मग रणजित पाटील यांचा मतांचा कोटा कमी होतो; परंतु तरीही पाटील हे महाडिक यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांच्या उमेदवारीस फारसा धोका नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

ताटातलं वाटीत...
‘गोकुळ’च्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांनी सोमवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांना दिले आहेत; परंतु अशी संधी देताना सत्तारूढ आघाडीची कसोटी लागणार असून, त्यांची स्थिती ‘धरलं तर चावतंय...’ अशी झाली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी म्हणजे विद्यमान संचालकांच्या वारसांनाच पॅनेलमध्ये संधी दिली जाणार आहे, असे करणे म्हणजे ‘ताटातलं वाटीत’ अशीच स्थिती असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ संचालकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: With the Mandalik Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.