‘वनश्री’ पुरस्काराने मंडलिक यांची ‘दूरदृष्टी’ अधोरेखित
By admin | Published: March 20, 2017 11:35 PM2017-03-20T23:35:21+5:302017-03-20T23:35:21+5:30
कारखान्याच्या वयाइतकेच झाडांचेही वय : निसर्ग समतोलासाठीच हमीदवाडा परिसरात वनराईला प्राधान्य
दत्तात्रय पाटील --म्हाकवे --जेथे कुसळही उगवत नव्हतं, अशा हमीदवाड्याच्या फोंड्या माळावर दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी साखर कारखाना उभारण्याचे शिवधनुष्य उचलले आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेललेही.
१९९८ला कारखान्याची पायाखुदाई करतानाच काखान्याचे जेवढं वय तेवढंच कारखाना परिसरातील झाडांचंही असलं
पाहिजे. या हेतूने त्यांनी वृक्षारोपणाला महत्त्व दिले. कोणत्याही पुरस्काराची अथवा गौरवाची अपेक्षा न करता केवळ निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी त्यांनी हजारो झाडे लावली. त्यांचे नेटके संगोपन करून या फोंड्या माळावर आमराई अवतरली आहे. त्यामुळे कारखान्याला राज्य शासनाचा जाहीर झालेला यंदाचा वनश्री पुरस्कार हा मंडलिक यांच्या कार्यकर्तृत्वाला आदरांजली वाहणाराच असल्याच्या भावना कार्यकर्त्यांतून उमटत आहेत.
९ आॅगस्ट १९९६ या क्रांतिदिनी हमीदवाडा कारखान्याला मंजुरी मिळाली. प्रत्यक्षात १९९८-९९ मध्ये या कारखान्याच्या उभारणीला प्रारंभ झाला. यासाठी या माळावर खड्डे खुदाईचे काम सुरू झाले. कारखाना उभारणीचे काम दर्जेदार व्हावे,
यासाठी कै. सदाशिवराव मंडलिक हे या माळावर रणरणत्या उन्हातही तळ ठोकून होते. यावेळी या माळावर एखादे झुडूपही नव्हते.
त्यामुळे मंडलिकांनी कारखान्याच्या नियोजित जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी नियोजनबद्धपणे झाडे लावण्यासाठी खड्डे काढले. यामध्ये नाटळे, आंबा, विविध वनझाडे व औषधोपयोगी झाडेही लावली. या कारखान्याशी संलग्न असणाऱ्या
एस. डी. एम. फौंडेशनवरही झाडे लावून हा परिसर निसर्गरम्य केला आहे.
प्रा. मंडलिकांकडूनही आदर्श वाटचाल कायम
मंडलिकांनी कारखाना कार्यस्थळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुलविले. तर कारखान्याची प्रशासकीय इमारत उभारून त्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा पुतळाही बसविला आहे. त्यामुळे हमीदवाडा कारखाना मंडलिकांचे जिवंत स्मारक व्हावे यासाठी प्रा. संजय मंडलिक यांनीही त्यांच्या आदर्श तत्त्वानुसार कारखान्याची वाटचाल सुरू ठेवली आहे. गतवर्षी त्यांनी बेनिग्रे, सावर्डे, गोरंबे, चिमगाव, आदी दहा गावांत कारखान्याच्या स्वनिधीतून गाव तलाव, ओढे, विहिरीच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. याचा या गावातील शेतकऱ्यांना चांगलाच लाभ झाला.
कारखाना परिसर पर्यटनस्थळ बनविले
स्व. मंडलिकांच्या दूरदृष्टीतून कारखाना उभारणीपासून लावलेली झाडे आज मोहरली आणि बहरलेली आहेत. येथील मुख्य द्वारावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा, प्रशासकीय इमारत, तर आता प्रा. मंडलिकांनी स्व. मंडलिकांचा पूर्णाकृती पुतळा उभारून येथे प्रेरणास्थळही निर्माण केले आहे.
तसेच निपाणी-मुरगूड राज्य मार्गावरून दक्षिण बाजूला भव्य स्वागत कमान उभी केली आहे. तर या कमानीपासून कारखान्यापर्यंत सुमारे ४०० मीटर रस्त्याच्या दुतर्फा विविध झाडे लावली आहेत. त्यामुळे हमीदवाडा कारखाना परिसर एक पर्यटनस्थळ बनले आहे.