गणेशउत्सव साजरा न करण्याचा २० गावातील मंडळांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 03:43 PM2020-08-10T15:43:47+5:302020-08-10T15:50:00+5:30
कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव विचार घेता कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २० गावातील गणेश मंडळानी सार्वजनिक गणेशउत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोडोली : कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव विचार घेता कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २० गावातील गणेश मंडळानी सार्वजनिक गणेशउत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अनुकरण कोडोलीतील गणेश मंडळानी करावे असे आवाहन कोडोली पोलिस ठाण्याचे सपोनि सुरज बनसोडे यांनी केले. या आवाहनास येथील मंडळाचा सामिश्र प्रतिसाद मिळाला.
यावेळी काही मंडळानी यावर्षीपुरते उत्सव साजरा करणार नसल्याचे तर काही मंडळानी गणेशोत्सव साधेपणाने व शासकीय नियमाचे पालन करीत साजरा करणार असल्याचे सांगितले.
कोडोली पोलीस ठाणे व ग्रामपंचायतीच्या वतीने हौसिंग सोसायटीच्या सभागृहात सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच शंकर पाटील होते.
येथे शंभरहून अधिक गणेश मंडळे आहेत. यावेळी सपोनि सुरज बनसोडे यांनी कोडोलीत कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाने घालून दिलेले नियम सांगत २० गावातील मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचे सांगितले. त्याचे अनुकरण कोडोलीतील मंडळांनी करावे असे आवाहन केले.
यावेळी श्री ची स्थापना करणे ही मंडळांची परपंरा असल्याने गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे विचार मांडले. शासकीय नियमानुसार गणेश मूर्तीची उंची, सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन, उत्सव काळात कोणतीही सजावट न करता तसेच मिरवणूक न काढता साधेपणाने उत्सव साजरा करू असे आश्वासन कार्यकर्त्यानी यावेळी दिले.
मडळांनी धर्मादाय आयुक्त, पोलिस स्टेशन यांची परवानगी घ्यावी व त्यासाठी ग्रामपंचायत पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन सरपंच शंकर पाटील यांनी दिले. यावेळी माजी सरपंच नितीन कापरे, माजी उपसरपंच निखिल पाटील, प्रवीण जाधव यांच्यासह मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच कुंभार समाजातील बांधव मोठया प्रमाणावर उपस्थित होते.