सार्वजनिक मंडळांकडून मांडव उभारणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:19 PM2020-08-19T14:19:30+5:302020-08-19T14:27:23+5:30
कोरोना संकटाच्या काळातही कोल्हापुरातील मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीची परंपरा जपत यंदा साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी लहान आकारांतील मांडव उभारले जात आहेत.
कोल्हापूर : कोरोना संकटाच्या काळातही कोल्हापुरातील मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीची परंपरा जपत यंदा साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी लहान आकारांतील मांडव उभारले जात आहेत.
मुंबई, पुणे आणि कोकणानंतर कोल्हापुरातील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. सांस्कृतिक आणि पुरोगामी वारसा लाभल्याने येथील गणेशोत्सवाचे देखावेदेखील आगळेवेगळे, आकर्षक पण प्रबोधन करणारे असतात. हे देखावे पाहण्यासाठी ग्रामीण व शहरातील नागरिक रस्त्यांवर येतात. त्यासाठी महिनाभर आधीपासूनच मंडळांची लगबग सुरू होते. मात्र गेल्या वर्षीपासून हे चित्रच पालटले आहे.
गतवर्षी गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधीच महापूर येऊन मोठे नुकसान झाले होते; त्यामुळे उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यावर्षी तर कोरोनाने नागरिकांना जणू घरातच डांबून ठेवले आहे, सगळीकडे संसर्गाची धास्ती आहे, भोवतालचे नागरिक बाधित आहेत, अर्थव्यवस्थेची चाके रुतली आहेत.
या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव आला आहे, त्यात आता महापुराचीही भीती आहे. या सगळ्या संकटांचा सामना करीत यंदा नागरिक हा उत्सव साजरा करीत आहेत. कोल्हापुरातील गणेशोत्सवात मोठ्या गणेशमूर्ती हे महत्त्वाचे आकर्षण असते; पण शासन, प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार यंदा सर्वच मंडळांनी चार फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती ठरवल्या आहेत; तर काही मंडळांनी प्रतीकात्मक म्हणून एक-दीड फुटाची मूर्ती ठरवली आहे.
यंदा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत नसल्याने मंडळांनी वर्गणीही मागितलेली नाही. वातावरण भीतीचे असले तरी गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेची परंपरा मंडळांनी अबाधित राखली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मंडळांच्या वतीने लहान आकारातील मांडव उभारणी सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी मांडव उभारले जात आहे.