पती निधनानंतर मंगळसूत्र तोडणार नाही, सावित्रीबाई फुले जयंतीदिनी महिलांनी घेतली शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 11:06 AM2022-01-04T11:06:11+5:302022-01-04T11:06:46+5:30
आर्य समाजाच्या कार्यालयात झालेल्या छोट्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या मंगल शेटे यांनी ही शपथ उपस्थित महिलांना दिली.
कोल्हापूर : येथील आर्य श्रमिक संघटनेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात पती निधनानंतर मंगळसूत्र तोडणार नाही आणि बांगड्या फोडणार नाही, अशी शपथ घेण्यात आली. शाहू ब्लड बँकेजवळील आर्य समाजाच्या कार्यालयात झालेल्या छोट्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या मंगल शेटे यांनी ही शपथ उपस्थित महिलांना दिली.
यावेळी दिल्ली येथे २६ जानेवारी रोजी होणाऱ्या संचलनासाठी निवड झाल्याबद्दल आदिती साळोखे, एकता साळोखे, तेजस्विनी अनगळ यांचा सत्कार झाला. यावेळी निर्मला कुराडे, प्राची मंडलिक आदी महिला उपस्थित होत्या.
जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना बालकल्याण संकुल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. संस्थेच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अधीक्षक द्रौपदी पाटील, नजिरा नदाफ, सचिन माने, टी. एम. कदम, स्मिता वायचळ, मीना कालकुंद्रे आदी उपस्थित होते. गोखले कॉलेजमध्ये प्राचार्य डॉ. पी. के. पाटील, उपप्राचार्य एस. एच. पिसाळ, प्रा. पी. बी. झावरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.