माणगांव ग्रामपंचायतीने उचलेले विधायक पाऊल, हेरवाडनंतर माणगांवनेही घेतले 'हे' महत्वाचे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 07:15 PM2022-05-11T19:15:45+5:302022-05-11T19:16:02+5:30
अभय व्हनवाडे रूकडी/माणगांव : शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा एेतिहासिक निर्णय घेतला. असा क्रांतिकारक निर्णय घेणारी ...
अभय व्हनवाडे
रूकडी/माणगांव : शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा एेतिहासिक निर्णय घेतला. असा क्रांतिकारक निर्णय घेणारी राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली. यानंतर माणगाव ग्रामपंचायतीने देखील महिलांसाठी असेच महत्वाचे निर्णय घेतले आहे. यामुळे महिलांना एक बळ मिळणार आहे. पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील या दोन्हीही ग्रामपंचायती आहेत.
माणगाव ग्रामपंचायतीने नुकत्याच झालेल्या मासिक सभेत विधवा प्रथा बंद करणेचा निर्णय घेतला आहे. यासाठी गावात जनजागृती करणेचा व विधवा महिलांना सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजामध्ये विधवा महिलांना योग्य सन्मान न दिल्याने त्याचे मानसिकतेवर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच राजू मगदूम यांनी सांगितले.
पतीच्या निधनानंतर समाजामध्ये विधवा महिलेच्या कपाळावरील कुंकू पुसणे, पायातील जोडव्या काढणे, हातातील बांगड्या फोडणे, गळयातील मंगळसूञ काढले जाते. शिवाय विधवा महिलांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी करून घेतले जात नाही. यामुळे गावासह देशात विधवा महिलेना सन्मानाने जगता यावे याकरिता ही प्रथा बंद करणेचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायत सदस्या संध्याराणी जाधव यांनी हा ठराव मांडला. याप्रसंगी उपसरपंच अख्तर भालदार, ग्रामविकास अधिकारी बी. बी. राठोड सह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
माहेरची साडी म्हणून पैठणी भेट
माणगाव गावांतील कन्येच्या विवाहप्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने माहेरची साडी म्हणून २५०० रुपये पर्यतची पैठणी साडी भेट म्हणून देण्याचाही निर्णय घेण्यात आला.