माणगाव परिषद फुले-आंबेडकर चळवळीचा दीपस्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:58 AM2021-01-13T04:58:11+5:302021-01-13T04:58:11+5:30
कोल्हापूर : ऐतिहासिक माणगाव परिषदेमुळेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने विख्यात नेतृत्व जन्माला घातले. त्यामुळे ही परिषद म्हणजे ...
कोल्हापूर : ऐतिहासिक माणगाव परिषदेमुळेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने विख्यात नेतृत्व जन्माला घातले. त्यामुळे ही परिषद म्हणजे फुले- आंबेडकर चळवळीचा दीपस्तंभ आहे, असे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डाॅ. सुरेश माने यांनी केले. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात रविवारी ‘माणगाव परिषद आंबेडकरी संघर्षाचे रणशिंग’ या पुस्तकावर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.
ॲड. डाॅ. माने म्हणाले, तत्कालीन कागलमधील माणगावमध्ये २१ आणि २२ मार्च १९२० ला राजर्षी शाहू महाराज व डाॅ. बाबासाहेबांच्या एकमताने नव्या समीकरणाची सुरुवात झाली. ही सुरुवात म्हणजे डाॅ. बाबासाहेबांच्या सामाजिक व राजकीय संघर्षाची सुरुवात म्हटले, तर वावगे ठरणार नाही. गतकाळातील संघर्षाची गाथा स्वतंत्रपणे ग्रंथाच्या रूपाने आणली आहे. माणगाव परिषदेने डाॅ. बाबासाहेबांच्या रूपाने विख्यात नेतृत्व साऱ्या जगाला दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिषदेचे शताब्दी वर्ष असूनही ते खुलेआम करता आले नाही. त्याऐवजी २१ व २२ मार्च २०२० ला ऑनलाइन पद्धतीने एक विशेषांक काढून करण्यात आले. त्यावेळी झालेली ही परिषद आजच्या पिढीला व तथाकथित नेत्यांना दिशा देणारी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रमुख उपस्थित डाॅ. अमर कांबळे, डाॅ. अनिल माने, प्राचार्य डाॅ. प्रशांत नागावकर यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. स्वागत रामचंद्र कांबळे, तर प्रास्ताविक प्रभुदास खाबडे यांनी केले. आभार हुसेन भालदार यांनी केले. यावेळी सुशीलकुमार कोल्हटकर, डाॅ. सुभाषचंद्र पाटणकर, प्रा. किरण माने, पदाधिकारी इब्राहिम भालदार, शौकत शेख आदी उपस्थित होते.