दारूबंदीसाठी माणगावकरांचा संघर्ष
By admin | Published: August 24, 2016 12:06 AM2016-08-24T00:06:26+5:302016-08-24T00:31:53+5:30
ऐतिहासिक गाव : विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या दरबारी आता निर्णय?
दत्ता बिडकर-- हातकणंगले --राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात ‘माणगाव करार’ झाला होता. त्या ऐतिहासिक माणगाव गावाला दारूबंदीसाठी आता संघर्ष करावा लागत आहे. १५ आॅगस्टपासून गावामध्ये दारूबंदीसाठी ग्रामसभेत ठराव होऊनही गावामध्ये चालू असलेली बेकायदेशीर दारूविक्री बंद करावी यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य हातकणंगले पोलिस ठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयसिंगपूर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे वारंवार तक्रारी आणि निवेदन देत आहेत. तरीही गेले सहा महिने दारू विक्रेते पोलिसांच्या आशीर्वादाने बिनधास्त दारू विक्री करीत असल्याने हतबल झालेले ग्रामपंचायत पदाधिकारी थेट कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या दरबारी आता पोहोचले आहेत. त्यामुळे आता तरी गावातील दारूबंदी करण्यासाठी महासंचालक पुढाकार घेतात का, याबद्दल ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे.
तालुक्यातील माणगावमध्ये राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात अस्पृश्यता परिषद झाली होती. यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे नेते होतील, असे भाकीत केले होते. ते खरे ठरले होते. असा ऐतिहासिक वारसा असलेल्या माणगाव गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक होत आहे.
या ऐतिहासिक वारसा असलेल्या गावामध्ये दारू विक्री करण्यात येऊ नये, असा ठराव १५ आॅगस्ट २0१६ रोजी माणगाव ग्रामपंचायतीने केला होता. या गावामध्ये शासनमान्य बीअर बार अथवा देशी-विदेशी दारू विक्रीबाबत ग्रामपंचायतीने अद्याप कोणताही परवाना दिला नाही, असे असताना गावात सात ते आठ ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू बिनधास्त विक्री केली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित राष्ट्रीय स्मारकाशेजारीच गावठी हातभट्टी दारूची विक्री करून याच परिसरात रिकाम्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या टाकून परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण करीत असल्याने ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत वैतागून गेले आहेत.
माणगाव ग्रामपंचायतीने १५ आॅगस्ट २0१६ च्या ग्रामसभेत गावात दारूबंदीसाठी ठराव करून हातकणंगले पोलिस ठाणे, जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर यांच्याकडे ग्रामसभा ठराव आणि पत्रव्यवहार करून गावात दारू विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी हातभट्टी दारू हा विषय फक्त पोलिसांचा नसून, यासाठी उत्पादन शुल्क विभागही तेवढाच जबाबदार असल्याचे कारण देत पोलिसांनी वेळ मारून नेली असल्याचे माणगाव ग्रामपंचायतीचे मत आहे. गावातील दारूबंदी होत नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकारी यांना धारेवर धरले असून, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी माणगावच्या दारूबंदीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या दरबारी धाव घेतली आहे. त्यामुळे आता नांगरे-पाटील यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्मारक होणार : ग्रामसभेत ठराव
माणगावमध्ये राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात अस्पृश्यता परिषद झाली होती. यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे नेते होतील, असे भाकीत केले होते. ते खरे ठरले होते. असा ऐतिहासिक वारसा असलेल्या माणगाव गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक होत आहे. या ऐतिहासिक वारसा असलेल्या गावामध्ये दारू विक्री करण्यात येऊ नये, असा ठराव १५ आॅगस्ट २0१६ रोजी माणगाव ग्रामपंचायतीने केला होता.