आमजाई व्हरवडे ‘पेयजल’ची चौकशी होणार
By Admin | Published: November 23, 2014 11:01 PM2014-11-23T23:01:26+5:302014-11-23T23:55:34+5:30
४९ लाख रुपयांच्या या योजनेच्या अनेक कामाला अजून सुरूवातच झालेली नाही.
सुनील चौगले -आमजाई व्हरवडे --आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेच्या कामाबद्दलच्या तक्रारींची जि.प.ने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची चार पाच दिवसांत चौकशी पूर्ण केली जाणार असून, खरोखर या पेयजल योजनेत गैरकारभार झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एस. शेंडे यांनी सांगितले.आमजाई व्हरवडे येथे गेल्या दोन-तीन वर्षांपासून पेयजल योजनेचे काम सुरू आहे. ४२ लाख रुपये मंजूर असलेल्या या योजनेचे काम पूर्ण होण्याअगोदरच काही पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी संगनमताने ग्रा.पं.च्या बॅँक खात्यातून उचल केल्याचे उघड झाले आहे. ग्रामसभेत ठराव करूनसुद्धा रकमेची उचल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत पेयजल योजनेच्या कमिटीतील चौदा सदस्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे लेखी तक्रार करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
जि.प.च्या संबंधित विभागाकडून या प्रकरणाच्या चौकशीला आजपासून सुरूवात केली असून, या चौकशीचा अहवाल चार ते पाच दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ४९ लाख रुपयांच्या या योजनेच्या अनेक कामाला अजून सुरूवातच झालेली नाही. नवीन टाकीत तर पाणीच पडलेले नाही. नवीन झालेल्या या योजनेत ३० टक्के सुद्धा नवीन पाईपलाईन केलेली नाही. जुन्या पाईपलाईनचे नवीन जॅकवेलमधून पाणी सुरू केले जाते. मग रक्कम उचल झाली असताना पाईपलाईनची रक्कम कोठे गेली, याबाबत ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.