आंब्याची आवक; डाळींचा ‘भाव’ चढाच
By admin | Published: April 27, 2015 12:09 AM2015-04-27T00:09:27+5:302015-04-27T00:15:41+5:30
आठवडी बाजार : भुईमूग शेंगांची आवक, साखरेच्या दरातही वाढ
कोल्हापूर : शहरातील बाजारात रविवारी भुईमुगाच्या शेंगा दाखल झाल्या. शेंगाचा प्रतिकिलो दर ४० रुपये इतका होता. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे लग्नासाठी लागणाऱ्या साहित्याला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. तसेच डाळींचे दर कडाडले असून आंब्यांची आवक वाढली आहे.बाजारात डाळींचे दर कडाडले आहेत. प्रतिकिलो तूरडाळ १२० रुपये, हरभरा डाळ ६० रुपये, उडीदडाळ ९५ वरून ११० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. तब्बल १५ रुपयांनी उडीदडाळ वाढली आहे.
जिरे २२०, तर साखर २६ रुपयांवरून ती २८ रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर भाज्यांमध्ये कोबी, वांगी, टोमॅटो, कारली, भेंडीचे दर स्थिर आहेत. मात्र, गवारच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे ती ७० रुपये झाली आहे. कोथिंबीरची आवक कमी व मागणी वाढल्याने पेंढीचा दर सात रुपये झाला आहे, तर मेथी दहा ते १५ रुपयांच्या घरात गेली आहे.
घाऊक बाजारात किलोमागे दोन रुपयांनी बटाटा वाढून त्याचा दर १२ रुपये झाला आहे.
सरकीत दुसऱ्यांदा वाढ...
या महिन्यात सरकी तेलाच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. गत आठवड्यात ६६ रुपयांवरून ६८ रुपयांवर तर सध्या ७० रुपये प्रतिकिलो इतका दर आहे.
जिऱ्यात वाढ; तीळ उतरला
बाजारात जिऱ्याच्या दरात तब्बल प्रतिकिलो २० रुपयांनी वाढ झाली आहे. जिऱ्याचा दर ३०० रुपये झाला आहे. मात्र, तिळाचा दर २० रुपयांनी घसरून तो १४० रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्याचबरोबर विशेषत: चटणीसाठी लागणारे वाळलेले खोबऱ्याचा दर १६० रुपये प्रतिकिलो रुपये असा स्थिर आहे.
आंब्यावर नजर...
प्रकाररुपये
हापूस (पेटी)3000
हापूस (बॉक्स)१२००
पायरी (बॉक्स)५५०
लालबाग(बॉक्स)१६०
तोतापुरी (टन)२०000
मद्रास हापूस (बॉक्स)७००
मद्रास पायरी (बॉक्स)३५०
लालबागचे आगमन...
बाजारात रत्नागिरी, देवगड हापूस व पायरी आंब्याबरोबर आता गुजरातच्या लालबाग आंब्याचे आगमन झाले आहे. लालबाग आंब्याचा (बॉक्स)चा दर १६० रुपये आहे. त्यामुळे ग्राहकांची लालबाग आंबा घेण्यासाठी गर्दी वाढली आहे.