मनपाकडून कचऱ्यापासून खतनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2017 01:05 AM2017-04-30T01:05:07+5:302017-04-30T01:05:07+5:30
‘एकटी’चे घेणार सहकार्य : पथदर्शी प्रकल्पाचे कामकाज मंगळवारपासून सुरू
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरातील सहा प्रभागांतील ओला कचरा गोळा करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प मंगळवार(दि.२)पासून सुरूकरण्यात येणार आहे. महापालिका प्रशासन हा प्रकल्प राबविण्याकरिता शहरातील ‘एकटी’ या स्वयंसेवी संघटनेचे सहकार्य घेणार आहे.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रोत्साहन आणि मदतीमुळे ‘एकटी’ या स्वयंसेवी संस्थेने निर्माण चौकालगत असलेल्या मैलखड्डा परिसरात दैनंदिन दीड टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प उभारला असून, तो आॅक्टोबर २०१६ पासून कार्यान्वीत झालेला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला असल्यामुळे महापालिका प्रशासनही असेच छोटे-छोटे प्रकल्प शहरात सुरूकरण्याच्या विचारात आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून पुईखडी येथे चार प्रभागांसाठी पथदर्शी प्रकल्प साकारला जात आहे.
उपनगरातील कळंबा फिल्टर हाऊस, सानेगुरुजी वसाहत, सुर्वेनगर, फुलेवाडी, कणेरकर नगर, जीवबा नाना पार्क अशा सहा प्रभागांतील ओला कचरा गोळा करून तो पुईखडी येथील केंद्रावर पोहोचविला जाईल. तेथे तो कुजविला जाऊन त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाईल. वरील सहा प्रभागांतील सुका कचरा आठवड्यातून एकदा ‘एकटी’तर्फे उचलला जाणार आहे. पुईखडीजवळील सेंद्रिय खत निर्माण करण्याचा प्रकल्प यशस्वी झाल्यास शहरात अन्य काही ठिकाणी असे प्रकल्प कार्यान्वीत करण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. सध्या कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कसबा बावडा येथील जागेवरचा ताण कमी होईल, कचरा वाहतुकीचा खर्चही कमी होईल, अशी अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांची मोठी मदत
एकटी संस्थेने सुरूकेलेल्या सेंद्रिय खत तयार करण्याच्या प्रकल्पास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोठी मदत केली आहे. बारा लाखांचे आॅर्गनिक वेस्ट कन्व्हर्टर मशीन, घंटागाड्या, महिला कर्मचाऱ्यांना अॅप्रन, हँडग्लोव्हज, शूज, खोरी, घमेली असे साहित्य घेऊन दिले आहे. मंत्री पाटील यांच्या मदतीमुळेच हे शक्य झाले, असे ‘अवनि’च्या अनुराधा भोसले व ‘एकटी’च्या मनीषा पोटे यांनी सांगितले.
असा आहे ‘एकटी’चा प्रकल्प
तपोवन व रामानंदनगर-जरगनगर प्रभागांतून कचरा गोळा केला जातो.
प्रत्येक प्रभागात चार घंटागाड्या, आठ परिसर विकास भगिनी व एक सुपरवायझर काम करतो.
कचरा वर्गीकरण, शिवाय मैलखड्डा येथील केंद्रात पुन्हा वर्गीकरण केले जाते.
प्रत्येक दिवशी दीड टन ओला कचरा गोळा केला जातो.
आॅर्गनिक वेस्ट कन्व्हर्टर (ओडब्ल्यूसी)मशीनमध्ये ओला कचरा बारीक केला जातो.
प्लास्टिक कचऱ्याची स्क्रॅप डीलरला विक्री केली जाते.
दहा दिवसांत सेंद्रिय खत तयार होते.