इस्लामपुरात मानापमान नाट्य

By admin | Published: January 28, 2017 11:29 PM2017-01-28T23:29:34+5:302017-01-28T23:29:34+5:30

नगरपालिकेतील चित्र : राष्ट्रवादी विकास आघाडीत शहराच्या विकासापेक्षा नेतेगिरीलाच उधाण

Manipat Natya in Islampur | इस्लामपुरात मानापमान नाट्य

इस्लामपुरात मानापमान नाट्य

Next

अशोक पाटील --इस्लामपूर --नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातील बाकड्यावरील एककलमी कार्यक्रम संपुष्टात आल्यानंतर, राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर उपनगराध्यक्ष झालेल्या दादासाहेब पाटील यांनी स्वत:सह सभापतींना बसण्यासाठी वेगळ्या दालनाची व्यवस्था असावी, यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. त्यातच सत्ताधारी विकास आघाडीतही नेत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वचननाम्यापेक्षा बैठक व्यवस्थेसाठीच नेत्यांत मानापमानाचे नाट्य रंगले. शहराच्या विकासापेक्षा नेतेगिरीलाच उधाण आले आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकाळात तत्कालीन पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील स्वत:च्या दालनात न बसता, बाहेरील बाकड्यावर बसून शहराचा कारभार हाकत होते. या बाकड्याबरोबरच त्यांचा गटही आता नेस्तनाबूत झाला आहे. डांगे आणि एन. ए. गु्रप यांचे अस्तित्व मात्र अबाधित राहिले आहे. विकास आघाडीमध्ये नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, विक्रम पाटील, आनंदराव पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांचा राबता पालिका वर्तुळात सुरू झाला आहे. यापूर्वी नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची बैठक व्यवस्था होती. मात्र उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी कधीही या खुर्चीचा वापर केला नाही. आता ते पक्षप्रतोद या नात्याने उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्या दालनासाठी भांडत आहेत.
राष्ट्रवादीने नगराध्यक्षांच्या दालनात लावलेली राजारामबापू पाटील आणि आमदार जयंत पाटील यांची छायाचित्रे विकास आघाडीला अडचणीची वाटू लागली आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पाटील यांनी आपल्या बैठक व्यवस्थेत बदल केला आहे. भाजपच्या एका जबाबदार नेत्याने तर ही छायाचित्रेच काढून टाकणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
इस्लामपूरची राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले होते. परंतु अपक्ष नगरसेवक दादा पाटील यांच्या भूमिकेमुळे नगरपालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसू लागले आहे. शिक्षण सभापतीपद वगळता उर्वरित सर्व सभापतीपदे राष्ट्रवादीकडे गेली आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्षांसह सभापतींची वेगळी बैठक व्यवस्था करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास पालिका आवारातील झाडाखाली बसूनच कारभार करू, असा इशाराही दिला आहे.


सत्तांतरानंतर : छायाचित्रे जाण्याची शक्यता
पालिकेतील सत्तांतरानंतर विकास आघाडीच्या नेत्यांनी तेथील दालनात तात्काळ एम. डी. पवार व अशोकदादा पाटील यांची छायाचित्रे लावली आहेत. वर्षानुवर्षे नगराध्यक्षांच्या दालनात राजारामबापू पाटील, जयंत पाटील यांची झळकणारी छायाचित्रे विकास आघाडीकडून हटविली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास छायाचित्रे उपनगराध्यक्षांच्या दालनात लावण्यात येतील. नगराध्यक्षांनी आपली आपली बैठक व्यवस्थेत बदल केला.

Web Title: Manipat Natya in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.