Kolhapur: एमडी ड्रग्जची विक्री; मनीष नागौरीसह दोघांना अटक, साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त
By उद्धव गोडसे | Published: September 14, 2024 05:11 PM2024-09-14T17:11:08+5:302024-09-14T17:12:22+5:30
कोल्हापूर : एमडी ड्रग्ज या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेला समीर उर्फ साजन उर्फ पाबलो गुलाब शेख (वय ३१, ...
कोल्हापूर : एमडी ड्रग्ज या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेला समीर उर्फ साजन उर्फ पाबलो गुलाब शेख (वय ३१, सध्या रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर, कोल्हापूर, मूळ रा. बारामती, जि. पुणे) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून ३६ हजार रुपये किमतीचे ड्रग्ज, मोबाइल आणि अलिशान कार असा १५ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याला ड्रग्ज पुरवणारा कुख्यात तस्कर मनीष रामविलास नागौरी (रा. सांगली नाका, इचलकरंजी) यालाही पोलिसांनी अटक केली. कळंबा येथील संकल्पसिद्धी हॉलसमोर शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी पोलिसांनी ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमडी ड्रग्ज विक्रीसाठी कळंबा येथील हॉलसमोर एक व्यक्ती येणार असल्याचे समजले होते. त्यानुसासर शुक्रवारी सायंकाळी सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे आणि उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने सापळा रचला. करड्या रंगाची संशयास्पद कार येताच चालकाला ताब्यात घेऊन कारची झडती घेतली. झडतीदरम्यान कारमध्ये १२ ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळले.
पोलिसांनी कारचालक समीर शेख याला अटक करून अधिक चौकशी केली असता, संबंधित ड्रग्ज इचलकरंजी येथील कुख्यात तस्कर मनीष नागौरी याच्याकडून आणल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने नागौरी याला अटक केली. दोन्ही संशयितांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. अंमलदार महेश गवळी, अशोक पवार, अमित सर्जे, संतोष बर्गे, वैभव पाटील, विजय इंगळे, विनोद कांबळे, महेंद्र कोरवी, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
नागौरीकडून आता ड्रग्ज तस्करी
पिस्तूल तस्करीतून पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेला मनीष नागौरी याचे अनेक कारनामे आहेत. इचलकरंजी परिसरात त्याने अवैध व्यवसायांचे साम्राज्य निर्माण केले आहे. एमडी ड्रग्जचा पुरवठादार तोच असल्याचे समोर आल्याने त्याचा ड्रग्ज तस्करीतील सहभाग स्पष्ट झाला आहे. त्याच्या चौकशीतून ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.