Kolhapur- यादवनगर गोळीबार प्रकरण: नागोरीकडून टोळ्यांना पिस्तूले विक्रीचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 01:54 PM2024-04-24T13:54:40+5:302024-04-24T13:56:05+5:30
गुन्हेगारी वाढण्याचा धोका, पळालेल्या दोघांचा शोध लागेना; पोलिसांच्या भूमिकेवर शंका
कोल्हापूर : यादवनगर येथे रविवारी (दि. २१) रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेत कुख्यात पिस्तूल तस्कर मनीष नागोरी याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असला तरी, अद्याप तो सापडलेला नाही. त्यानेच जिल्ह्यातील गुंडांच्या टोळ्यांना पिस्तुलांची विक्री केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याच्यावर अनेकदा कारवाया केल्यानंतरही शस्त्र तस्करी सुरूच असल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
इचलकरंजीतील मनीष नागोरी याच्यावर शिरोली, इचलकरंजी, सातारा शहर आणि पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात शस्त्र तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनानंतर पोलिसांनी नागोरी याला अटक करून त्याचा जबाब नोंदवला होता. मुंबईसह मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातून शस्त्रे आणून १० ते १५ हजारांत त्यांची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाया केल्या होत्या.
मात्र, अजूनही त्याची शस्त्र तस्करी सुरूच असल्याचे समोर येत आहे. यादवनगरात झालेल्या गोळीबारात त्याचे नाव आल्याने पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. यादवनगरातील एस. एम. टोळीशी त्याचा संबंध असेल तर जिल्ह्यातील अन्य टोळ्यांशीही त्याचा संपर्क असल्याचा संशय बळावला आहे. त्याने आजवर जिल्ह्यात किती शस्त्रांची विक्री केली? कोणाला विक्री केली? विकलेली शस्त्रे कोणत्या प्रकारची आहेत? ती कुठून आणली होती? याचा पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे.
अवैध शस्त्रे सापडणार?
गेल्या १५ दिवसांत शहरात दोन गुन्ह्यामंध्ये तीन पिस्तूलांचा वापर झाला. तिन्ही पिस्तूल विनापरवाना आहेत. अशी अनेक शस्त्रे गुंडांकडे असल्याने त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे. तातडीने हे काम झाले नाही तर, ऐन निवडणुकीच्या काळात शस्त्रांचा गैरवापर होण्याचा धोका आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर शंका
ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. जिल्ह्यात खुलेआम मटका, जुगार अड्डे सुरू आहेत. गुंडांच्या टोळ्या दहशत माजवत आहेत. आचारसंहिता सुरू असतानाही खुलेआम गोळीबाराच्या घटना घडतात. अवैध शस्त्रांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. याबाबत निवडणूक आयोग आणि राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.