थेट पाईपलाईनसाठी तीन कंपन्या पात्र मनीष पवार : पुढील आठवड्यात चर्चेच्या फेर्या
By Admin | Published: May 16, 2014 12:42 AM2014-05-16T00:42:38+5:302014-05-16T00:44:08+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन योजनेसाठी काढलेल्या फेरनिविदा प्रक्रियेत देशपातळीवरील प्रतिसाद दिलेल्या तीनही कंपन्या पात्र ठरल्या आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन योजनेसाठी काढलेल्या फेरनिविदा प्रक्रियेत देशपातळीवरील प्रतिसाद दिलेल्या तीनही कंपन्या पात्र ठरल्या आहेत. आज, गुरुवारी महापालिकेत उघडलेल्या निविदेत लार्सन अॅँड टूब्रो लिमिटेडने २१.१० टक्के, जीकेसी प्रोजेक्ट लिमिटेडने १८.९ टक्के व मेघा इंजिनिअरिंगने २०.६५ टक्के निविदेपेक्षा जादा दराने टेंडर भरली आहेत. पुढील आठवड्यात आयुक्त कमी रकमेचे टेंडर भरलेल्या ‘जीकेसी’बरोबर चर्चा करतील, अशी माहिती जल अभियंता मनीष पवार यांनी दिली. शहरातील नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पाणी मिळावे म्हणून ४२३ कोटी रुपये खर्चाची काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना राबविण्यात येत आहे. काळम्मावाडी योजनेला केंद्र सरकारच्या ‘युआयडीएसएसएमटी’ योजनेतून मंजुरी मिळाली असून, ४२३.२२ कोटींच्या खर्चापैकी १७० कोटींचा निधीही राज्य सरकारकडे जमा झाला आहे. योजनेला मंजुरी मिळताच महानगरपालिका प्रशासनाने राष्टÑीय व आंतरराष्टÑीय पातळीवर निविदा प्रसिद्ध केली होती. तिला प्रतिसाद देत देशभरातील २५ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी निविदा पूर्वबैठकीला उपस्थिती लावली होती. मात्र, या योजनेसाठी पुढील तीन वर्षांतील किमान १०० कोटींचा येणारा जादा खर्च कोणी करायचा यावरून या कंपन्यांनी नकारघंटा दर्शविली. यावेळी जीकेसी प्रोजेक्ट लिमिटेडने सर्वांत कमी २७ टक्के जादा रकमेची निविदा भरली होती. मात्र, महापालिकेने पाच टक्क्यांपेक्षा अधिक घसारा रक्कम देण्यास नकार दिला. दुसर्यांदा पुन्हा ३ मार्च २०१४ रोजी काढलेल्या निविदेत लार्सन अॅँड टूब्रो लिमिटेड (चेन्नई), जीकेसी प्रोजेक्ट लिमिटेड (हैदराबाद), मेघा इंजिनिअरिंग (हैदराबाद) या कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. महापालिकेने तांत्रिक निविदांची छाननी केली. कंपन्यांची वार्षिक उलाढाल, तीन वर्षांतील कामाचा परफॉर्मन्स यांसह त्यांचे काम काढून घेण्याची कार्यवाही झाली आहे का, कोणत्या संस्थेने त्यांच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई केली आहे का, त्यांनी घेतलेली कोणती योजना मागच्या तीन वर्षांत विफल झाली आहे का, आदी माहिती घेऊन दुसरी वित्तविषयक निविदा उघडण्यात आली. आता कमी रकमेच्या निविदा आलेल्या जीकेसी प्रोजेक्ट लिमिटेडबरोबर आणखी दर कमी होण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. (प्रतिनिधी)