मनीषा मिरजकर ठरल्या ‘बुलेट’च्या मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2015 12:26 AM2015-12-01T00:26:00+5:302015-12-01T00:36:54+5:30

दिमाखदार सोहळा : ‘लोकमत दीपोत्सव बंपर लकी ड्रॉ जाहीर; संदीप पाठक यांच्या प्रयोगाला गर्दी

Manisha Mirajkar decided to 'bullet' honorary | मनीषा मिरजकर ठरल्या ‘बुलेट’च्या मानकरी

मनीषा मिरजकर ठरल्या ‘बुलेट’च्या मानकरी

Next

कोल्हापूर : दसरा-दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने व्यावसायिक व ग्राहकांचा दुहेरी फायदा करून देणाऱ्या ‘लोकमत दीपोत्सव २०१५’ योजनेच्या ‘बंपर ड्रॉ’मध्ये राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील मनीषा विश्वनाथ मिरजकर (कुपन क्र. ३१३९२, व्यंकटेश्वरा गारमेंटस्) या बुलेटच्या विजेत्या ठरल्या. पहिल्या क्रमांकाच्या ३२ इंची एलईडीचे मानकरी दिगंबर कुंभार (कुपन क्र. ३४१२०, हेडा एंटरप्रायजेस) हे ठरले. राजाराम महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी सायंकाळी वाचकांच्या गर्दीत रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात हा ड्रॉ काढण्यात आला.
या ड्रॉसमवेत आयोजित मराठी अभिनेता संदीप पाठक यांचे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री विनोदी नाटकाचा विशेष प्रयोग उपस्थितांसाठी पर्वणी ठरला. ‘राजाकाका ई-मॉल’चे दीपक केसवाणी, ‘चिपडे सराफ’चे बन्सीधर चिपडे, ‘सुभाष फोटोज्’चे शंभू ओऊळकर, ‘वारणा दूध संघा’चे सरव्यवस्थापक बी. बी. भंडारी, ‘रॉयल ब्ल्यू मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड’चे मनोज कोळेकर, ‘अ‍ॅक्वॉ क्रिस्टल’चे सुशांत जोशी, ‘जसवंत स्वीटस्’चे इंदरलाल चौधरी, ‘तनिष्क’चे प्रसाद कामत यांच्या हस्ते ड्रॉ काढण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी रोप देऊन ड्रॉचे प्रायोजक, मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर बंपर ड्रॉसह नऊ ड्रॉ काढण्यात आले. योजनेतील सहभागी व्यावसायिकांसाठी ३२ इंची एलईडी बक्षीस असलेला ड्रॉ काढण्यात आला. त्यात ‘स्टारलाईट मोबाईल’ हे मानकरी ठरले. व्यावसायिकांना दसरा-दिवाळीदरम्यान जाहिरातीद्वारे उत्पादनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविता यावी व ग्राहकांचा खरेदीचा आनंद बक्षिसांनी द्विगुणित व्हावा या दुहेरी उद्देशाने राजाकाका ई-मॉल आणि मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ प्रस्तुत ‘लोकमत दीपोत्सव २०१५’ योजना आयोजित केली होती. १३ आॅक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत ही योजना घेण्यात आली. ग्राहकांनी योजनेतील सहभागी व्यावसायिकांच्या दुकानांतून वस्तूंची खरेदी केल्यावर त्यांना कुपन देण्यात आले होते. या योजनेतील ‘दसरा’ व दिवाळीपूर्वी दोन लकी ड्रॉ काढण्यात आले. त्यानंतर हा बंपर लकी ड्रॉ काढण्यात आला. या योजनेचे रॉयल ब्ल्यू मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, व्ही. काकडे सराफ, अ‍ॅक्वॉ क्रिस्टल, सुभाष फोटोज्, वारणा, जसवंत स्वीटस् हे प्रायोजक आहेत. (प्रतिनिधी)

उर्वरित विजेत्यांची नावे उद्याच्या अंकात
या योजनेतील ९ हजार ९९९ रुपयांचे सोने, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, मायक्रो ओव्हन, डिजिटल कॅमेरा, इंडक्शन कुकर, मोबाईल, इस्त्री आणि अन्य उत्तेजनार्थ बक्षिसांच्या विजेत्यांची नावे उद्या, बुधवारच्या अंकात प्रसिद्ध केली जातील.
‘लोकमत’ची सामाजिक बांधीलकी
‘लोकमत’चा वर्धापनदिन आणि जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त ‘लोकमत’तर्फे छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात विक्री झालेल्या छायाचित्रांची रक्कम सामाजिक बांधीलकीतून ‘लोकमत’ने चेतना विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका संध्या इनामदार यांच्याकडे
बन्सीधर चिपडे यांच्या हस्ते सुपूर्द केली.

‘लोकमत’मुळे इच्छा पूर्ण
‘लोकमत-दीपोत्सव २०१५’ मधील बंपर ड्रॉमधील बुलेटच्या मानकरी ठरलेल्या मनीषा मिरजकर या राजारामपुरी तिसऱ्या गल्लीमध्ये राहतात. त्यांचे मिरजकर चिरमुरे-पोहे सेंटर आहे. एकत्र कुटुंबातील मनीषादेखील दुकान सांभाळतात. माझ्या आयुष्यातील हे पहिलेच बक्षीस असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, माझा मुलगा ओंकार याला बुलेट घेण्याची इच्छा होती. आज ‘लोकमत’मुळे ती इच्छा पूर्ण झाली.
हसत खेळत ‘वऱ्हाड लंडनला’
कोल्हापूर : नॉन मॅट्रिक पास बबन्याची लग्नातील मध्यस्थी, अस्सल मराठवाडी बाज असलेला ‘बाप्पा’, लंडनमधील मुलीबरोबर लग्नासाठी हट्ट धरलेला ‘काशीनाथ’, त्याचा आनंद सर्वस्व मानणारी माय, अशा विविध पात्रांचे विनोदी शैलीत सादरीकरण करून अभिनेता संदीप पाठक यांनी सोमवारी रसिकांना हसविले. निमित्त होते ‘लोकमत-दीपोत्सव २०१५’ चा बंपर ड्रॉनिमित्त आयोजित ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाचे.
राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यात अभिनेता पाठक यांनी मराठवाड्यातील एका खेडेगावातील गर्भश्रीमंत शेतकरी असलेल्या बाप्पाचा मुलगा काशीनाथ हा लंडनमधील एका मुलीच्या प्रेमात पडला. तिच्याशी लग्न करण्याचा त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी लंडनपर्यंत वऱ्हाड घेऊन जाण्यातील गमती-जमती सादर केल्या. त्यात अस्सल मराठवाड्यातील बाज असलेला ‘बाप्पा’, लंडनमधून शिक्षण घेऊन परतलेला ‘काशीनाथ’, त्याची माय, बाप्पाकडून लग्नाचा मध्यस्थी असलेला ‘बबन’, लंडनमधील ‘ज्युली’ व तिचे वडील ‘जॉनराव’, गावातील ज्येष्ठ नागरिक ‘शास्त्री बुवा’ यांच्यासह काशीनाथचे नातेवाईक, महिला-पुरुष ग्रामस्थ अशी विविध पात्रे, त्यांंचे संवाद, देहबोलीतून सादर केली. त्यात ‘बबन’ने मराठीतील इंग्रजी आणि इंग्रजीतील मराठीचा केलेला अनुवाद, त्याचे पत्रलेखन, वाक्यागणिक म्हणींचा वापर करणारी काशीनाथची माय, जॉनराव आणि बाप्पा यांच्यातील लग्नाची बोलणी, आदी प्रसंगी आणि खेडगाव ते मुंबई आणि लंडनपर्यंतचा प्रवास त्यांनी विनोदी पद्धतीने सादर करून रसिकांना पोट धरून हसायला लावले. रसिकांनी हास्यासह टाळ्यांच्या गजरात त्याला दाद दिली. दोन तासांहून जास्त ही हास्यमैफल रंगली. दरम्यान, ड्रॉसाठी उपस्थित असलेल्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. यात जयश्री जंगटे, सुमन पवार, सुनील इंगवले हे बक्षिसाचे मानकरी ठरले.

Web Title: Manisha Mirajkar decided to 'bullet' honorary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.