मानेवाडीची शाळा जमीनदोस्त!
By admin | Published: August 8, 2016 11:24 PM2016-08-08T23:24:45+5:302016-08-08T23:36:29+5:30
इमारत निकामीचा २०११ मध्ये शेरा : ‘लोकमत’ने मांडली होती व्यथा; तीन वर्षांपासून वर्गखोल्याच नाहीत
श्रीकांत ऱ्हायकर ल्ल धामोड
मानेवाडी (ता. राधानगरी) येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीची व्यथा ‘लोकतम’ने ५ आॅगस्टच्या अंकात मांडून या शाळेची इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असा अंदाज व्यक्त केला होता. ही बाब आज खरी ठरली असली, तरी दुसरी धोकादायक बाब म्हणजे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गखोल्यांना गेल्या तीन वर्षांपासून वर्गखोल्याच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वर्गखोल्या नसणारी राज्यातील ही पहिलीच शाळा आहे. शासनाच्या शिक्षणाबाबतच्या धोरणाबद्दल व प्रत्यक्ष परिस्थिती यांच्यात प्रचंड तफावत असल्याचे समोर येत असून, पालकवर्गातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दोन वर्गखोल्या असून, दोन वर्गखोल्यात पहिली ते सातवीचे वर्ग भरतात.
या शाळेला लागूनच अंगणवाडीची इमारत असल्याने या खोलीतही उर्वरित वर्ग भरवले जात आहेत. विशेष म्हणजे या शाळेची ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी. ए. पाटील यांनी ७ जुलै २०११ रोजीच्या भेटीवेळी दिला होता. पण असे असतानादेखील अंगणवाडीसह ‘आठ’ वर्ग या धोकादायक इमारतीमध्ये इतकी वर्षे का भरवले जात होते. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच की काय, रविवारी शाळेला सुटी असतानाच ही इमारत कोसळली. तीन खोल्यांपैकी एक खोली रविवारी जमीनदोस्त झाली. २०११ पासून इथे पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू झाले असून, या वर्गांना वर्गखोल्याच नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे.
४रविवारी शाळेची इमारत पडली असतानाही सोमवारी शाळाभेटीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना याच इमारतीच्या वर्गखोल्यांत का बसविले? हेही अद्याप कळत नाही.
४जोपर्यंत शाळेच्या वर्गखोल्या दिल्या जाणार नाहीत, तोपर्यंत आम्ही शाळेला मुले पाठविणार नाही. किंबहुना पंचायत समिती अथवा सक्षम अधिकाऱ्यांनी इथे भेटी देऊन आम्हाला वर्गखोल्यांबद्दल ठाम विश्वास द्यावा, तरच वर्ग भरवू, अशी तीव्र प्रतिक्रिया तरुणांनी दिली आहे.
४विस्तार अधिकाऱ्यांनी वारंवार इमारत धोकादायक असल्याचा शेरा देऊनही व ग्रामशिक्षण समितीने १३ आॅगस्ट २०१५, १५ सप्टेंबर २०१५, २९ सप्टेंबर २०१५ रोजी वारंवार प्रस्ताव सादर करूनही त्याला केराची टोपली दाखविली आहे.
आम्ही सोमवारी शाळेला भेट दिली असून, शाळेची उर्वरित इमारतही विद्यार्थ्यांना बसण्यास योग्य नसल्याचे पाहिले आहे. मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या हे वर्ग गावात दोन ते तीन घरांत बसविण्याची सूचना मुख्याध्यापकांना दिली आहे. योग्य ती कारवाई निश्चित केली जाईल.
- जयसिंग खामकर, सभापती,
पंचायत समिती राधानगरी.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व नवीन इमारत मंजुरीसाठी आम्ही उद्या वरिष्ठांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- प्रवीणसिंह पाटील, सरपंच,
कोते, मानेवाडी