बामणी घारीच्या पंखात अडकला मांजा, अग्निशमन दलाकडून सुटका
By संदीप आडनाईक | Updated: December 19, 2022 16:01 IST2022-12-19T16:00:51+5:302022-12-19T16:01:10+5:30
घारीला सुखरुप सोडवून नैसर्गिक अधिवासात सोडले

बामणी घारीच्या पंखात अडकला मांजा, अग्निशमन दलाकडून सुटका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने काल, रविवारी सकाळी मांजात अडकलेल्या बामणी घारीला सुखरुप सोडवून नैसर्गिक अधिवासात सोडले.
रंकाळा परिसरातील राजकपूर पुतळ्यानजिक आर. के. गॅरेजजवळील दाट झाडीत चिंचोळ्या जागेत एक बामणी घार पतंगाच्या मांजा दोरीत अडकली होती. पूर्णवाढीच्या या घारीचा आपल्या जोडीदारासह अधिवास आहे. आरके गॅरेजमधील एका कामगाराला या घारींपैकी एका घारीच्या पंखात मांजा दोरा गुंडाळल्यामुळे जागेवरच थांबून असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ टिंबर मार्केट परिसरातील अग्निशमन दलाच्या कार्यालयात कळविले. तेथील स्टेशन मास्टर दस्तगीर मुल्ला यांनी तत्काळ एक वाहन घटनास्थळी पाठविले. पक्षीप्रेमी नाना नामजोशीही तेथे पोहोचले.
चालक सनी पटेल यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, ज्या जागेत घार अडकून पडली होती, ती अतिशय चिंचोळी आणि घनदाट झाडी असल्याचे लक्षात आले. त्या जागेत गाडी जात नसल्यामुळे घारीची सुटका करणे कठीण होत होते. त्यामुळे गॅरेजमधील पोखलँडच्या बास्केटमध्ये बसून एका जवानाने घारीजवळ पोहोचत तिची सुटका केली.
सुदैवाने पंखाच्या टोकाला मांजा दोरा गुंडाळल्यामुळे आणि तिने कोणतीही हालचाल न केल्यामुळे घार फारशी जखमी झाली नसल्याचे तपासणीत लक्षात आले. या घारीचा जोडीदार त्याच जागी असल्यामुळे जवानांनी तिला त्याच जागी असलेल्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. या मोहिमेत टिंबर मार्केट येथील अग्निशमन दलाचे चालक सनी पटेल, संग्राम मोरे, बाबुराव सणगर यांनी भाग घेतला.