मानाच्या गणेशपुजनाने कोल्हापूरच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 11:20 AM2017-09-05T11:20:55+5:302017-09-05T11:28:06+5:30
मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’ चे पालखी पूजन आणि आरतीनंतर खासबाग मैदान येथून मंगळवारी सकाळी नऊ वाजता कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीस झाला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पूजन झाले.
कोल्हापूर, दि. ५ : मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’ चे पालखी पूजन आणि आरतीनंतर खासबाग मैदान येथून मंगळवारी सकाळी नऊ वाजता कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीस झाला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पूजन झाले.
यावेळी महापौर हसिना फरास, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, कोल्हापूर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहीते, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर,शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, माजी महापौर आर. के. पोवार, अॅड. धनंजय पठाडे, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पोवार, लाला गायकवाड, माजी नगरसेवक आदील फरास, मराठा महासंघाचे वसंत मुळीक, अनिल घाटगे, उद्योजक चंद्रकांत जाधव, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, दिलीप देसाई, नगरसेवक विजय सुर्यवंशी, विजय करजगार आदी उपस्थित होते.
श्रीमंत प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकाने परिसर दणाणून सोडला. फुलांनी सजविलेल्या पालखीचे पालकमंत्री पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील आदी मान्यवरांनी सारथ्य करत ही पालखी मिरजकर तिकटीपर्यंत वाहून नेली. यावेळी मिरजकर तिकटी येथे तुकाराम माळी तालीम मंडळाने देखाव्यात सादर केलेल्या कोल्हापूर -वैभववाडी या ‘अंबाबाई एक्सप्रेस ’ ला हिरवा झेंडा दाखवत मार्गस्थ केले.
इतिहास घडवा
गेले दहा बारा दिवस डॉल्बी विरहीत मिरवणूक काढण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन पोलीस प्रशासनाने केले आहे. त्यास अनुसरुन यंदाची कोल्हापूरसह राज्यभरातील गणेश विसर्जन मिरवणूक ‘न भूतो न भविष्यती’अशी होईल. यात महीलांसह बालकांचाही सहभाग असेल. कारण मंडळे यंदा कर्णकर्कश आवाजाचे डॉल्बीचे राक्षस मिरवणूकीत लावणार नाहीत आणि ते मंडळांनी लावू नयेत. यासाठी पर्यायी परंपारिक वाद्यांचा गजर चांगला आहे, त्याचा वापर करावा. डॉल्बीविरहीत मिरवणूक काढून राज्यात कोल्हापूरचे नाव होऊ दे आणि इतिहासही घडू दे, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
गाव तिथं निर्माल्य, विसर्जन कुंड
मिरवणूकीच्या उदघाटनानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांच्याशी चर्चा करताना गायकवाड यांनी ‘ गाव तिथ निर्माल्य व गणेश विसर्जन कुंड’ अशी संकल्पना पालकमंत्र्यांसमोर मांडली. पाटील यांनी तत्काळ त्यास होकार देत गावे जर श्रमदानातून असे कुंड करणार असतील तर आम्ही त्यांना साहित्य पुरविण्यास तयार आहोत, असे सांगितले.
दादांनी वाजविला ढोल...
डॉल्बीविरहीत मिरवणूकीच्या यशानंतर व मानाच्या ‘श्री ’ च्या पालखीचे सारथ्य केल्यानंतर चंद्रकांतदादांना ढोल ताशा पथकाच्या तडतडाटामुळे ढोल वाजविण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी काही काळ ढोल वाजवत विसर्जन मिरवणुकीचा आनंद व्यक्त केला.