तुम्ही तर गोचिडीसारखे जनतेचे रक्त शोषले; आरक्षणाच्या जन्मभूमीतून जरांगे पाटील यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 07:07 AM2023-11-18T07:07:16+5:302023-11-18T11:57:27+5:30

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी कोल्हापूर येथील सभेत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.

Manoj Jarange Patil criticized NCP leader Chhagan Bhujbal over reservation | तुम्ही तर गोचिडीसारखे जनतेचे रक्त शोषले; आरक्षणाच्या जन्मभूमीतून जरांगे पाटील यांचा पलटवार

तुम्ही तर गोचिडीसारखे जनतेचे रक्त शोषले; आरक्षणाच्या जन्मभूमीतून जरांगे पाटील यांचा पलटवार

कोल्हापूर : माझ्या गावात जाऊन मंत्री छगन भुजबळ आज बरळले. मी सासऱ्याचं खातो, असे ते म्हणतात. अरे बाबा, मी घाम गाळून कष्टाचं खातोय. तुम्ही तर राज्यातील गोरगरीब जनतेचे रक्त गोचिडाप्रमाणे शोषले. एकेकाळी घरी खायला अन्न नसताना आता करोडोंची संपत्ती बळकावली, त्यामुळेच तुम्हांला जेलमध्ये बेसन-भाकरी खावी लागली, असा घणाघाती हल्लाबोल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी रात्री येथे झालेल्या सभेत केला.

सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. दुपारी तीन वाजता सुरू होणाऱ्या या सभेस जरांगे यांचे रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी व्यासपीठावर आगमन झाले. त्यांच्या व्यासपीठावर शाहू महाराज व माजी खासदार संभाजीराजे यांची उपस्थिती होती. सभेला कोल्हापूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती.

ते म्हणाले, भुजबळ शुक्रवारी आमच्या गावात जाऊन खूप काही बरळल्याचे कळले. वयाच्या मानाने असे होते. त्यांच्याशी आमचे व्यक्तिगत मतभेद नव्हते. त्यांच्याबद्दल माझ्या मनात इज्जत होती. केवळ त्यांच्या विचाराला विरोध होता; पण या माणसाने आज पातळी सोडली. एवढ्या मोठ्या माणसाने माझ्यासारख्यावर बोलताना सांभाळून बोलायला पाहिजे. मी सासऱ्याचं खातो असे त्यांचे म्हणणे आहे. तुम्ही कोणत्या पाहुण्याचं खाता...? कसा पैसा मिळवला...? हे सगळं आम्हांला माहीत आहे. तुम्ही गोरगरीब जनतेचे रक्त गोचिडाप्रमाणे शोषले. जनतेचा तळतळाट लागला आणि जेलमध्ये जाऊन बेसन-भाकरी खावी लागली.

जरांगे-पाटील म्हणाले, भुजबळ यांना राज्यात सामाजिक दंगली घडवून आणायच्या आहेत. जातीय तेढ निर्माण करायची आहे. सरकारने त्यांना रोखावे. त्यांच्या बोलण्यावर बारीक लक्ष ठेवावे; अन्यथा आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांना रोखावे. जर तुम्हाला रोखता आले नाही तर सरकार म्हणून तुमचीही एकदा भूमिका स्पष्ट करा, असे आव्हान जरांगे यांनी दिले.

गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका
काहीजण म्हणतात आम्हाला कुणबीचे प्रमाणपत्र नको. कुणबी या शब्दात वाईट काय आहे, अशी विचारणा करत जरांगे म्हणाले, ज्याला वाटतं, कुणबी नको त्यांनी आपलं सारं विकावं आणि चंद्रावर राहायला जावं. गोरगरिबांचे कल्याण व्हायला लागल्यावर तुम्ही त्यांच्या अन्नात माती का कालविता? तुम्हाला आंदोलनात यायचे नसेल तर गप्प घरी बसा.

डॉक्टर म्हणाले याला किडनीच नाही
राज्य सरकार माझ्यावर षङयंत्र रचतंय. सरकारमधील मंत्री काय डाव टाकतील कळत नाही. एक डॉक्टर तपासायला पाठविला. त्याने मला किडनीच नाही म्हणून सांगितलं. मी उपोषण स्थगित केल्यानंतर दवाखान्यात ॲडमिट झालो. डॉक्टरांना म्हटले मला किडनी आहे की नाही बघा. त्यांनी तपासणीअंती सांगितलं, किडनी आहे म्हणून. मग या सरकारी डॉक्टरने काय जनावरला तपासलं होते काय ? तुम्ही माझ्या पाठीशी आहात. तुमच्या पाठबळावर, ताकदीवर त्यांचे सगळे डाव उधळून लावत आहे, असे जरांगे म्हणाले.

संभाजीराजे व्यासपीठावर या नाही तर मी खाली येईन
सभा सुरू होताच संभाजीराजे आपली सभा ऐकायला येणार असून, ते खाली समाजासोबत बसणार आहेत असे जरांगे यांना समजले. तेव्हा भाषणाला सुरुवात करताना म्हणाले, छत्रपतींच्या गादीचा शिष्य, तसेच तुमचा आदर आहे म्हणून संभाजीराजे मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही व्यासपीठावर यावे. जर आला नाहीत तर मला नाइलाजाने खाली यावे लागेल’. विशेष म्हणजे जरांगे यांनी, शाहू महाराज व संभाजीराजे यांना वाकून नमस्कार केला. संभाजीराजेंना दिलेल्या या आदराचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.

विलंब झाल्याबद्दल मागितली माफी
दुपारी तीन वाजता होणाऱ्या सभेला जरांगे यांचे रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी आगमन झाले. माायबाप हो मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. सभेला यायला उशीर झाल्याबद्दल मी तुमची माफी मागतो, असे सांगत जरांगे म्हणाले की, मराठा समाजाची एकजूट झालीय. लोक भेटायला आग्रह करीत आहेत. गाड्या जाणाऱ्या मार्गावर लोक गाड्यांच्या आडवे येत आहेत, स्वागत करीत आहेत. त्यांच्या अंगावर गाडी घालून पुढे जाण्याची माझी औलाद नाही. त्यामुळे येथे यायला वेळ झाला.

न्यायाच्या आडवे येणाऱ्याला सोडत नाही
आपणाला चारी बाजूने घेरण्याचा प्रयत्न होतोय. सावध राहा. कुणबीचे पुरावे असताना इतकी वर्षे ते दाबून ठेवले. परंतु, आता आपल्या आंदोलनामुळे ते सापडायला लागले आहेत. पण, एका पठ्ठ्याचा तिळपापड झालाय. हा माणूस कधीच सुधारणार नाही. आरक्षण टप्प्यात आलंय. माझ्या अंगात शिवशाहूंचे रक्त आहे. मी मराठ्याचा असल्याने कोणाला भीत नाही. माझ्या न्यायाच्या मागणीच्या आडवे कोणी आला तर सोडत नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

शंभर टक्के आरक्षण मिळणार
मराठ्यांना ओबीसीतून १०० टक्के सरसकट आरक्षण मिळणार आहे. कुणबी नोंदीचा कायदा २४ डिसेंबरला पारित होणार आहे. राज्य सरकारनेच तसं सांगितलंय. म्हणूनच मराठा बांधवांनो सावध राहा, अशी संधी पुन्हा येणार नाही. दान पदरात पडतंय ते पाडून घ्या. आपल्यातील मतभेद, राजकारण बाजूला ठेवा, एकजूट अशीच कायम ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.

आता लेकराला मोठं करा
आपल्याकडून एक चूक होत आलीय. आपण साहेबाला मोठा केला. त्यांची पोरं शिकायला परदेशात जातात. शिकून आली की त्यांना आपण भय्यासाहेब करतो. आपल्या पोरांना मात्र हाच साहेब नाम्या, तुक्या म्हणतो. आता लक्षात ठेवा, साहेबांच्या पोरांना मोठं करण्यापेक्षा आपल्या लेकराला मोठं करा, असे आवाहन जरांगे यांनी केले.

मी बँडमधील खुळखुळा वाजविणाऱ्यासारखा
अनेक मंत्र्यांना मी ३५ किलोंचा माणूस असल्याचे वाटते. तब्येतीवरून बँडमधील खुळखुळा वाजविणाऱ्यासारखा दिसतो. पण, आपला दणका लय अवघड आहे. मी येणाऱ्या प्रत्येक मंत्र्यांचे तासभर ऐकून घेतो. तुम्ही कोणतेही पुरावे नसताना ओबीसींना आरक्षण कसे दिले हे सांगा आधी असा आग्रह धरतो, तेव्हा हे मंत्री साहेबांना विचारून येतो म्हणून सांगून जातात. पुन्हा येतच नाहीत, असे सांगताच हशा पिकला.

Web Title: Manoj Jarange Patil criticized NCP leader Chhagan Bhujbal over reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.