‘त्या’ मनोरुग्णाचे वास्तव्य ‘धोक्या’खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:36 AM2017-09-11T00:36:02+5:302017-09-11T00:36:07+5:30
घन:शाम कुंभार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यड्राव : झोपण्यासाठी जमिनीचे अंथरूण, आभाळाचे पांघरूण, ऊन वाºयाचा सहवास अन् पावसाची अंघोळ अशा अवस्थेत ‘तो’ विद्युत ट्रान्स्फॉर्मरच्या खाली व जयसिंगपूर-कोल्हापूर मार्गाच्या शेजारी सतत ‘धोका’ अंगावर घेऊन वास्तव्यास आहे. याची विद्युत वितरण कंपनीनेही दक्षता घेणे गरजेचे आहे. मानव सेवा सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास ‘त्या’चे आरोग्य जीवनदायी होईल, अन्यथा हे ठिकाण ‘धोकादायक’ आहे. त्याला आरोग्यसेवेची गरज आहे.
जयसिंगपूर-कोल्हापूर मार्गावर एक्साईज कार्यालयाच्या शेजारी विद्युत वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर आहे. त्याच्याखाली गेल्या एक महिन्यापासून ‘तो’ पडूनच आहे. हे ठिकाण जयसिंगपूर-कोल्हापूर या राज्य मार्गालगत असल्याने येथून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. यामुळे हे ठिकाण अत्यंत धोकादायक आहे, तर ट्रान्स्फॉर्मरच्या खाली तो झोपून असल्याने विजेचा धक्का बसण्याचा धोकाही संभवतो.
या ठिकाणी तो झोपून असल्याने तेथील वाटसरूंच्या मदतीने त्याच्या खाण्याची सोय होते. येथील नागरिकांनी त्याला सुरक्षित व सावलीचे ठिकाण झोपण्यासाठी सुचवूनही त्याने तिकडे जाण्यास नकार दिला. काहींच्या मते, तो जयसिंगपूर येथील लक्ष्मी मंदिर परिसरातील रहिवासी आहे. त्याच्या अशा अवस्थेमुळे तो घराबाहेर असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याला याबाबत विचारले असता हातवारे करून येथील रहिवासी असल्याचे सुचवितो. अशक्तपणामुळे त्याचा आवाज उमटत नाही.
झोपण्यासाठी जमीन, आभाळाची सावली, ऊन-वाºयाचा सहवास असतानाच पावसाने अचानक त्याला अंघोळ घातली, हे पाहिल्यावर काहींच्या मनातील ‘माणूसपण’ जागे झाल्याने त्याला प्लास्टिकचे पांघरूण मिळाल्याने पावसापासून संरक्षण झाले. ट्रान्सफार्मरखाली गेले काही दिवस वास्तव्य असून, विद्युत वितरण विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास त्याचे जीवन आरोग्यदायी बनेल.