गोकुळमध्ये ‘मनपा’राज

By admin | Published: April 25, 2015 12:48 AM2015-04-25T00:48:49+5:302015-04-25T00:50:16+5:30

१६ जागांसह वर्चस्व : अध्यक्ष दिलीप पाटील यांचा पराभव; चंद्रकांत बोंद्रे, अमरीश घाटगे विजयी

'Manparaaj' in Gokul | गोकुळमध्ये ‘मनपा’राज

गोकुळमध्ये ‘मनपा’राज

Next

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या राजर्षी शाहू पॅनेलने १८ पैकी १६ जागा जिंकत सत्ता कायम राखली. मात्र, विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले, तर विरोधी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पॅनेलचे चंद्रकांत बोंद्रे व अमरीश घाटगे यांनी मुसंडी मारली. या विजयाने गोकुळमध्ये ‘मनपा’ (महाडिक-नरके-पी. एन. पाटील) यांची सत्ता कायम राहिली.
‘गोकुळ’ निवडणुकीसाठी गुरुवारी ईर्ष्येने तब्बल ९९.६९ टक्के मतदान झाले होते. सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार महादेवराव महाडिक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील विरुद्ध माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात ही सरळ लढाई झाली. शुक्रवारी सकाळी आठपासून सिंचन भवन येथील हॉलमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली. १५ टेबलांवर सर्वसाधारण गटातील, तर चार
टेबलांवर राखीव गटातील मोजणी करण्यात आली.
निवडणूक यंत्रणेने सरासरी दहा टक्के क्रॉस व्होटिंग होईल, या अंदाजाने मोजणी यंंत्रणा ठेवली; पण क्रॉस व्होटिंग जास्त झाल्याने सर्वसाधारण गटाच्या मोजणीस विलंब झाला. पहिल्या फेरीत राखीव गटातील सत्तारूढ गटाचे उमेदवार ६९ पासून ११६च्या फरकाने पुढे होते. दुसऱ्या फेरीतही मताधिक्य वाढत गेले. दुपारी पावणेदोन वाजता अनुसूचित जाती गटात सत्तारूढ गटाचे विलास कांबळे यांचा २२१ मतांनी विजय झाल्याची घोषणा केली. इतर मागासवर्गीय गटातून पी. डी. धुंदरे हे ३८३, भटक्या विमुक्त जाती गटातून विश्वास जाधव १६९, तर महिला गटातून जयश्री पाटील-चुरेकर व अनुराधा पाटील- सरुडकर या विजयी झाल्या.
सर्वसाधारण गटात उमेदवारांसह समर्थकांना शेवटपर्यंत श्वास रोखून धरावा लागला. पहिल्या फेरीत विरोधी आघाडीचे अमरीश घाटगे, चंद्रकांत बोंद्रे, किशोर पाटील हे तेरामध्ये घुसल्याने सत्तारूढ गटातील दिलीप पाटील, सदानंद हत्तरकी व वसंत खाडे अडचणीत आले. पहिल्या फेरीच्या १५०० मतांमध्ये खाडे व किशोर पाटील यांच्यात अवघ्या १३ मतांचा फरक होता. दुसऱ्या फेरीत खाडे यांनी पाटील यांना मागे टाकत ३५ चे मताधिक्य घेतले; पण २५० मतांच्या तिसऱ्या फेरीत पाटील मागे पडले आणि विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील व खाडे यांच्यात तेराव्या क्रमांकासाठी चढाओढ सुरू झाली. अखेर वसंत खाडे यांनी ४२ मतांनी विजय संपादन केला.
शपथा... तरीही क्रॉस व्होटिंग
दोन्ही पॅनेलने मतदारांना सहलीवर नेले होते. मतदानासाठी आणताना त्यांना शपथ घेऊन आणल्याने पॅनेल टू पॅनेल मतदान होईल, अशी सर्वांचीच अटकळ होती; पण तब्बल ६५ टक्के मतदान क्रॉस व्होटिंग झाल्याने सत्तारूढ गटाचे उमेदवार अडचणीत आले.
जयश्री पाटील सर्वाधिक मतांनी विजयी
‘गोकुळ’चे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पत्नी जयश्री पाटील या सर्वाधिक ३५८ मतांनी विजयी झाल्या. यावरून चुयेकरांच्या पश्चातही त्यांच्या कुटुंबावर संस्थाचालकांचे प्रेम असल्याचे दिसून आले. सर्वसाधारण गटात अरुण डोंगळे यांनी सर्वाधिक मते घेतली.
घालमेल आणि तणाव
सर्वसाधारण गटात निकराची लढत झाली. वसंत खाडे, दिलीप पाटील व किशोर पाटील यांच्यात चढाओढ सुरू असल्याने दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची घालमेल उडाली. आकडेमोड करताना कमालीचा तणाव निर्माण झाला. निकाल घोषित करेपर्यंत घालमेल व तणाव कायम राहिला.
शिरोळ, गडहिंग्लज संचालकाविना!
शिरोळ व गडहिंग्लज तालुक्याला संचालक पदाने हुलकावणी दिली. गडहिंग्लज तालुक्याला पहिल्यांदाच संचालकाविना राहावे लागणार आहे. करवीर तालुक्याला यावेळेला सहा संचालकपदे मिळाली.
प्रमुख पराभूत -
विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, संचालक बाबासाहेब चौगुले, माजी संचालक संजीवनीदेवी गायकवाड, विजयसिंह मोरे, सदानंद हत्तरकी, भूषण पाटील, किशोर पाटील, किरणसिंह पाटील, मधुकर देसाई.
पहिल्यांदाच संधी -
वसंत खाडे, उदय पाटील, अमरीश घाटगे, राजेश पाटील, जयश्री पाटील, विलास कांबळे.
उदय पाटील यांची मुसंडी
पी. एन. पाटील यांचे पुतणे उदय निवासराव पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात दिग्गजांना बाजूला सारत दमदार मुसंडी मारली. गेले तीन महिने मतदारांशी ठेवलेला थेट संपर्क व त्यांच्या स्वभावाचे फळ त्यांना मिळाले.
किशोर पाटील यांची कडवी झुंज
आमदार चंद्रदीप नरके यांचे कट्टर समर्थक किशोर पाटील (शिरोली दुमाला) यांनी शेवटपर्यंत निकराची झुंज दिली. त्यांनी सत्तारूढ गटाच्या उमेदवारांच्या बरोबरीने मतदान घेतले.
रटाळ मतमोजणी
निवडणुकीतील चुरस पाहता, क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात होणार, हे निश्चित होते. त्यामुळे मतमोजणीची यंत्रणा तेवढी ठेवणे गरजेचे होते. राखीव गटातील निकाल पावणेदोनलाच लागले; पण सर्वसाधारण गटातील निकालासाठी पाच वाजेपर्यंत वाट पहावी लागली.
अवैध मतांचा फटका
सर्वसाधारण गटातील उमेदवारांची संख्या ४१ होती. त्यातील १३ जणांना मतदान करायचे होते. त्यामुळे क्रॉस व्होटिंग करणे अवघड काम होते. गडबडीत एक-दोन शिक्के जास्त झाल्याने अवैध मतांची संख्या वाढली. तब्बल ११८ मते अवैध ठरली आणि त्याचा फटका सत्तारूढ गटाला बसला.
महाडिक गट, विषय कट...!
जिल्'ाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या व

Web Title: 'Manparaaj' in Gokul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.