मलकापूरच्या व्याख्यानमालेत नैतिक विचारांचे मंथन
By admin | Published: December 11, 2015 11:18 PM2015-12-11T23:18:19+5:302015-12-12T00:14:42+5:30
सार्वजनिक वाचनालयाने परंपरा जपली : शैलजादेवी पंतप्रतिनिधींच्या स्मरणार्थ लोकसहभागातून उपक्रम
मलकापूर : विशाळगड संस्थानातील पंतप्रतिनिधींच्या काळात स्थापन झालेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या व्याख्यानमालेचे यंदाचे नववे वर्ष. ही व्याख्यानमाला नैतिक व मानवतावादी विचारांच्या मंथनाने समृद्ध झाली. कै. शैलजादेवी पंतप्रतिनिधींच्या स्मरणार्थ लोकसहभागातून व्याख्यानमाला चालविण्याची परंपरा सार्वजनिक वाचनालयाने यावर्षीही जपली.
रत्नागिरीचे कीर्तनकार श्रीनिवास पेंडसे यांनी ‘धर्मवीर संभाजीराजे’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. संभाजीराजे लढवय्ये, पंडित व संयमी राजे होते. त्यांचा खरा इतिहास ऐतिहासिक दाखले देत त्यांनी श्रोत्यांपुढे मांडला. दुसरे पुष्प गुंफताना कागलच्या नीता मगदूम यांनी महिलांनी आर्थिक स्तरावर समानता साधली असली तरी अधिकारी स्तरावर मात्र उदासीनता आहे. महिलांना आरक्षण मिळाले; पण संरक्षण मिळाले नाही. सुखी संसाराचा मंत्र जपण्यासाठी विश्वास, समानता आणि संयम जपून महिलांविषयी सन्मानपूर्वक विचारधारा उभारावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
‘औषधाविना आरोग्य’ या विषयावर डॉ. स्वागत तोडकर यांनी कृत्रिम जीवनाऐवजी नैसर्गिक जीवन जगावे, ताणतणाव, भीती, शंका अनाठायी चिंता बाजूला ठेवणारी मानसिकता जपावी. छोट्या-छोट्या गोष्टींतून आनंद जपावा. यावेळी आशाराजे पंतप्रतिनिधींनी आरोग्याची चतु:सूत्री मांडली. प्रा. पांडुरंग सारंग यांनी सोशल मीडियाचे फायदे व तोटे मांडले. मोबाईल व छोट्या पडद्यावरील मालिका मनुष्यबळ रिकामटेकडे करणारे आहे. तरुणाईची शारीरिक क्षमता कमी करणारी नि श्रमाला धुडकावणारी ठरत आहे. अखेरचे पुष्प गुंफताना अॅड. राजशेखर मलुष्टे म्हणाले, भारतीय राज्यघटना सर्वसामान्य नागरिकांची कवचकुंडले आहेत. हक्काबरोबर कर्तव्याचे भान प्रत्येकाने ठेवले तर न्याय लवकर मिळू शकेल. विवेक हरविल्यास कायदे मोडले जातात. कायद्याचे ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज त्यांनी मांडली. व्याख्यानमालेस नगरपालिका, मलकापूर अर्बन बँक, वाचनालयाचे अध्यक्ष कुलदीप चौगुले, उपाध्यक्ष चारुदत्त पोतदार, सचिव दस्तगीर अत्तार, व्यापारी उमेश कोठावळे, भरतेश कळंत्रे यांचे योगदान लाभले. नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, ‘अर्बन’चे अध्यक्ष नंदकुमार कोठावळे, सागर पाटील,
अजित राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. रमेश पडवळ यांनी प्रास्तविक केले.
ग्रंथपाल अमर खटावकर यांनी आभार मानले. शताब्दी महोत्सव साजरा केलेले हे वाचनालय तालुक्यात व्याख्यानमाला घेणारे एकमेव व्यासपीठ आहे. दरवर्षी जीवनाच्या नव्या वाटा दाखविणारे वक्ते निमंत्रित करून, विचारांचा व्यापक जागर येथे घडविला
जातो. वैचारिक प्रबोधनाला लोकसहभागाची जोड देऊन वाचनालयाचे मंडळ ग्रामीण तरुणांत परिवर्तनाची बीजे रोवण्याचा
प्रयत्न करीत आहेत. मात्र, श्रोत्यांचा प्रतिसाद या व्याख्यानमालेला मिळत नसल्याची खंत संयोजकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)