मैनुद्दीन मुल्लाच मुख्य सूत्रधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:19 AM2017-08-14T00:19:33+5:302017-08-14T00:19:33+5:30
एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वारणानगर येथील कोट्यवधी रुपये चोरीप्रकरणी गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या मैनुद्दीन मुल्ला याला अटक करण्यामध्ये ‘सीआयडी’ला अखेर यश आले. वारणेचे कोट्यवधींचे घबाड कोणाचे, चोरीच्या पैशांतील कोणी-कोणी किती वाटा घेतला... अशा अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट त्याच्या चौकशीमध्ये होणार आहे. वारणा चोरीचा मुख्य धागा ‘सीआयडी’च्या हाती लागल्याने सांगली-कोल्हापूर पोलिसांचे धाबे दणाणले आहे.
वारणा शिक्षक कॉलनीतील साडेचार कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी १८ मार्च २०१६ रोजी मैनुद्दीन मुल्ला याला सांगली पोलिसांच्या ताब्यातून आपल्यां ताब्यात घेतले. पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची २२ मार्च २०१६ रोजी बिंदू चौक कारागृहात रवानगी केली. तेथून तो जामिनावर बाहेर पडताच त्याने मित्र संशयित विनायक महादेव जाधव (३५, रा. भामटे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याची भेट घेतली. त्याच्याकडे त्याने वारणानगर येथील चोरीमधील सुमारे ७० लाख रुपये ठेवण्यास दिले होते. त्याला दि. ३ जून २०१६ रोजी सायबर चौकात बोलावून त्याच्याकडून ६८ लाख रुपये घेऊन तो पसार झाला. त्याच्या शोधासाठी पुणे, मुंबई, बेळगाव, आदी ठिकाणी चार-पाच वेळा पथके पाठविली; परंतु ती रिकाम्या हातांनी परतली.
मैनुद्दीनचे भाऊ कादर मुल्ला, आमीर मुल्ला, नबाब मुल्ला, बहीण जनक सूरज नागरजी हे सर्व जाखले गावी राहतात. पोलिसांचे घरी येणे, बांधकाम व्यावसायिकाच्या धमक्या या तणावाखाली मैनुद्दीनच्या आईचे ११ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले. तिच्या अंत्यविधीला मैनुद्दीन येईल, या आशेपोटी पोलिसांनी घरासभोवती खबरे व साध्या वेशात पोलीस ठेवले होते; परंतु पोलिसांच्या अटकेच्या भीतीने तो घरी फिरकलाच नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक त्याला शोधण्यामध्ये अपयशी ठरले आणि तब्बल दीड वर्षाने सीआयडीच्या हाती मैनुद्दीन लागला.
त्याच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीत अनेक गौप्यस्फोट होणार आहेत. तो वारणा चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार होता. तो हाती लागल्याने सीआयडीच्या तपासाला वेग आला आहे.
यांना झाली अटक
संशयित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे, पोलीस हवालदार दीपक पाटील, पोलीस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे , मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला (रा. जाखले, ता. पन्हाळा), त्याचे साथीदार महादेव ऊर्फ गुंडा नामदेव ढोले (४४, रा. कोडोली, ता. पन्हाळा), विनायक जाधव (रा. भामटे, ता. करवीर), संदीप बाबासाहेब तोरस्कर (रा. बापट कॅम्प, कोल्हापूर).
अटकेच्या प्रतीक्षेत
संशयित कॉन्स्टेबल शंकर महादेव पाटील (५२, रा. महादेवनगर, सांगली), सहायक फौजदार शरद कुरळपकर, संशयित चंदनशिवेचा मित्र प्रवीण भास्कर-सावंत (रा. वासूद, जि. सांगोला) यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
रेहान अन्सारीचे सीआयडीसमोर आव्हान
मैनुद्दीनचा साथीदार रेहान अन्सारी (रा. बिहार) हा फरार आहे. अन्सारी व विनायक जाधव अशा तिघांनी मिळून ही चोरी केली होती. या गुन्ह्णातील सर्व आरोपी सापडले; पण अन्सारीचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही. तोही गायब आहे. मैनुद्दीन सापडला; आता अन्सारीचा शोध लावणे ‘सीआयडी’समोर आव्हान आहे.