मैनुद्दीनला पुण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:28 AM2017-08-14T00:28:38+5:302017-08-14T00:28:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर / पन्हाळा : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनी चोरीप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला (वय ३४, रा. जाखले, ता. पन्हाळा) याला शनिवारी मध्यरात्री ‘सीआयडी’च्या पुणे-चिंचवड पोलिसांनी अटक केली. त्यास रविवारी पन्हाळा न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विजय अवघडे यांनी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर शनिवार पेठ येथील सीआयडीच्या कार्यालयात चौकशी करून पुढील तपासासाठी एक पथक पुण्याला घेऊन रवाना झाले.
मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे तीन कोटींची रक्कम मिळाल्यानंतर वारणा शिक्षक कॉलनी बिल्डिंग नंबर ५ मध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत यांनी कोडोली पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांच्या विरोधात दोन गुन्हे कोडोली पोलीस ठाण्यात दाखल झाले. याप्रकरणी सीआयडीने संशयित निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सूरज चंदनशिवे, कुलदीप कांबळे, रवींद्र पाटील यांना अटक केली. या गुन्ह्णातील महत्त्वाचा आरोपी मैनुद्दीन मुल्ला फरार होता. त्याच्या शोध घेत असताना ‘सीआयडी’चे प्रभारी पोलीस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांना मैनुद्दीन हा पुण्यातील पिंपळे-गुरव गावात भाड्याने खोली घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री सीआयडीच्या पुणे-चिंचवड पोलिसांच्या मदतीने छापा टाकून त्याला अटक केली. तेथून सशस्त्र पोलीस बंदोबस्तात रविवारी सकाळी कोल्हापुरात आणले. सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करून पन्हाळा न्यायालयात हजर केले. यावेळी पोलीस अधीक्षक गायकवाड यांनी मैनुद्दीन हा सांगली पोलिसांच्या कोठडीत असताना तपासासाठी पोलीस अधिकारी विश्वनाथ घनवट, सूरज चंदनशिवे यांनी त्यास सांगली-आष्टामार्गे वारणा शिक्षक कॉलनी येथे आणले. ज्या ठिकाणी मैनुद्दीनने चोरी केली. त्या खोलीत तपासाच्या बहाण्याने घनवट, चंदनशिवे व सहकाºयांनी सुमारे सहा कोटी रुपये चोरून नेले. या प्रकरणातील मैनुद्दीन हा साक्षीदार असून चौकशीसाठी त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती केली. त्यास आरोपीचे वकील सुरेश कांबळे यांनी आक्षेप घेत मैनुद्दीन याला याच गुन्ह्णात दि. १६ मार्च २०१६ रोजी अटक केली होती. चोरीचा सर्व तपास झाला आहे. सांगली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक कॉलनीतील सर्व चोरीची रक्कम पोलिसांनी चोरली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मैनुद्दीन याचा या प्रकरणात दुरान्वयेही संबंध येत नाही. त्याला न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी विनंती केली. दोन्ही बाजंूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली. सरकार पक्षातर्फे अॅड. नितीन कुलकर्णी यांनी बाजू मांडली.
आष्ट्यात खरेदी केलेल्या बॅगेचा पंचनामा
पन्हाळा न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर सीपीआरमध्ये मैनुद्दीनची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर शनिवार पेठेतील कार्यालयात त्याला नेण्यात आले. याठिकाणी त्याने घनवट व चंदनशिवे यांनी पैसे नेण्यासाठी आष्ट्यामध्ये बॅग खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानुसार तत्काळ आष्ट्यातील त्या दुकानदाराचा जबाब व पंचनामा करण्यासाठी दुसरी टीम रवाना झाली.
लपविण्यामागे घनवट, चंदनशिवेंचा हात
कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मैनुद्दीनला अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर तो जामिनावर बाहेर पडला होता. गेल्या दीड वर्षापासून तो पसार होता. या काळात त्याला आसरा कोणी दिला, पैसा कोणी पुरविला, या सर्व प्रश्नांची उत्तरे सीआयडीच्या चौकशीत
निष्पन्न होणार आहेत. त्याच्याकडे मोबाईल मिळून आला आहे. त्याचे कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. दरम्यान, मैनुद्दीन पुन्हा पोलिसांच्या हाती लागल्यास आपले बिंग फुटेल या भीतीने संशयित घनवट, चंदनशिवे व त्यांच्या सहकाºयांनी त्याला पुण्यामध्ये ठेवले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमधूनच मैनुद्दीनचा शोध लागल्याची चर्चा आहे.