७० लाख घेऊन मैनुद्दीन मुल्ला पसार

By admin | Published: June 3, 2016 01:17 AM2016-06-03T01:17:04+5:302016-06-03T01:35:48+5:30

पत्नी, मित्रास अटक : तीन कोटी रक्कम जप्त प्रकरण

Manududdin Milla Pacear with 70 lakhs | ७० लाख घेऊन मैनुद्दीन मुल्ला पसार

७० लाख घेऊन मैनुद्दीन मुल्ला पसार

Next



कोल्हापूर : मिरज येथील बेथलहेमनगर येथील मेहुणीच्या घरातून जप्त केलेल्या तीन कोटी सात लाख रुपयांशिवाय मित्राकडे ठेवलेले वारणानगर येथील चोरीमधील सुमारे ७० लाख रुपये घेऊन मैनुद्दीन ऊर्फ अबुबकर मोहद्दीन मुल्ला पसार झाल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती उघड केली.
या प्रकरणी जामिनावर असलेल्या मैनुद्दीनने पोलिस ठाण्यात हजेरी न लावल्याने पोलिसांनी त्याचा मित्र व पत्नीला अटक केली. या दोघांच्या चौकशीनंतर मैनुद्दीन पसार झाल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी मैनुद्दीनचा मित्र संशयित विनायक महादेव जाधव (वय ३५, रा. भामटे, ता. करवीर,
जि. कोल्हापूर) आणि पत्नी
निलोफर मुल्ला (३२, रा. बेथलहेमनगर, मिरज, जि. सांगली) हिला अटक करण्यात आली असून, सध्या हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यात जाधव याची वापरलेली कार पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी पत्रकारांना दिली.
मिरजेतील बेथलहेमनगर येथून सांगली पोलिसांना संशयित
मैनुद्दीन मुल्ला याच्या मेहुणीच्या घरात अडीच महिन्यांपूर्वी सुमारे
तीन कोटी सात लाख रुपये
सापडले. ते पैसे पोलिसांनी जप्त केले. तपासात मैनुद्दीनने ही चोरी कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीमधील
फ्लॅट क्रमांक पाचमधून केली असल्याचे सांगितले. त्यानुसार सांगली व कोडोली पोलिसांनी वारणानगर शिक्षक कॉलनीतील ‘त्या’ खोलीवर छापा टाकला
असता तिथे आणखी सुमारे एक कोटी २९ लाख रुपये सापडले.
याप्रकरणी वारणा शिक्षण मंडळाचे सचिव
जी. डी. पाटील, मंडळाचा रोखपालासह सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी झाली होती. परंतू ही रक्कम आपल्या मुलग्याचा साडू व कोल्हापूरातील बांधकाम व्यावसायिक झुंजारराव सरनोबत यांची असल्याचे पाटील यांनी पोलिसांना सांगितले होते. जप्त केलेली हे पैसे कोडोली पोलिसांकडेच आहेत.
दरम्यान, मैनुद्दीन मुल्ला याला या चोरीप्रकरणी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगली पोलिसांकडून अटक केली. अटक केल्यानंतर त्याने प्रथम रेहान अन्सारी याच्या मदतीने वारणानगर येथे चोरी केल्याचे सांगितले; परंतु, तपासात रेहान अन्सारी
नावाची व्यक्तीच नसल्याचे निष्पन्न झाले. मैनुद्दीनकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र
संशयित विनायक जाधव याच्या मदतीने त्याच्या कारमधून चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले.विनायकला पोलिसांनी अटक केली आहे. मैनुद्दीनने चोरी केलेले पैसे त्याची पत्नी मोजत होती असे तपासात पुढे आले आहे. (प्रतिनिधी)

कोण हा मैनुद्दीन...
मैनुद्दीन पन्हाळा तालुक्यातील जाखले गावचा आहे. पूर्वी तो वडापचा व्यवसाय करीत होता. एक वर्षापासून मिरज येथे वास्तव्यास आहे. त्याचा प्रेमविवाह झाल्याने तो व पत्नी निलोफर मिरज येथील त्याच्या मेहुणीकडे राहावयास आहेत. मिरज येथे तो एका क्रेनवर कामाला होता. जाखलेत त्याची आई व दोन भाऊ आहेत.

घटनाक्रम...
१५ मार्च २०१६ ला वारणानगर येथे सांगली, कोडोली पोलिसांचा एकत्रित छापा
१८ मार्चला कोडोली पोलिसांनी केली
मैनुद्दीन मुल्लाला अटक.
२५ मार्चला सांगली पोलिसांकडून चोरीतील जप्त केलेले सुमारे तीन कोटी रुपये कोल्हापूरच्या ‘एलसीबी’ने ताब्यात घेतले.
२७ मे २०१६ रोजी पत्नी निलोफर मुल्ला, मित्र विनायक जाधवला अटक.
वारणानगर येथून चोरलेले पैसे आपला मित्र विनायक जाधवकडून घेऊन मैनुद्दीन मुल्ला पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणात मैनुद्दीनच्या सासूचीही चौकशी केली जाणार आहे.
- दिनकर मोहिते, पोलिस निरीक्षक,
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर

Web Title: Manududdin Milla Pacear with 70 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.