मनुग्राफचे संस्थापक अध्यक्ष सनतभाई शहा यांचे निधन, प्रिंटीग तंत्रज्ञानातील भीष्माचार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 03:37 PM2023-08-12T15:37:34+5:302023-08-12T15:38:44+5:30
मनुग्राफ इंडिया कंपनीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या न्यूजपेपर प्रिंटिंग मशीन उत्पादन क्षेत्रात दबदबा निर्माण केला
कोल्हापूर/शिरोली : येथील मनुग्राफ इंडिया कंपनीचे संस्थापक चेअरमन व ज्येष्ठ उद्योगपती सनतभाई मनुभाई शहा (वय ९२) यांचे शुक्रवारी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भारताला जागतिक दर्जाच्या मुद्रण तंत्रज्ञानाचा परिचय करून देणारे ‘मुद्रण क्षेत्रातील भीष्माचार्य’ अशी त्यांची ओळख होती.
कोल्हापुरात नव्वदच्या दशकात मनुग्राफमध्ये काम करणे हा प्रतिष्ठेचे समजले जाई. त्यांनी कामगार कल्याण क्षेत्रातील चांगल्या पद्धती लागू केल्या. उत्तम पगार, कॅन्टीन, वाहन सुविधा त्याकाळी सुरू केल्याने औद्योगिक क्षेत्रात वेगळीच प्रतिमा तयार झाली. उद्यमशील सनतभाई यांनी त्यांच्या पारंपरिक ट्रेडिंगच्या व्यवसायामधून १९५६ साली गोल्ड मोहर इंडस्ट्रीद्वारे स्टोव्ह व पेट्रोमॅक्सचे उत्पादन सुरू केले. एमआयडीसी शिरोली येथे मशीन फॅब्रिक पॉलिग्राफ इंडिया (आत्ताची मनुग्राफ इंडिया) कंपनीने विविध मशिन्सद्वारे ऑफसेट तंत्राची ओळख देशाला करून दिली. प्लामाग प्लुएन जर्मनी यांच्या जॉईंट व्हेंचरद्वारे १९८८ साली प्लामाग इंटरनॅशनलची स्थापना केली.
त्यानंतर स्वतंत्रपणे मनुग्राफ इंडिया कंपनीद्वारे अत्याधुनिक मुख्यत: वृत्तपत्र छपाई यंत्राचे उत्पादन करून या क्षेत्रात देशामध्ये नवा अध्याय सुरू केला. सनतभाईंनी लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यात त्यांचे दोन कर्तबगार सुपुत्र कंपनीचे अध्यक्ष संजय शहा व उपाध्यक्ष प्रदीप शहा यांची साथ मिळाली. सनतभाई यांनी कंपनी स्थापन करण्यासाठी उपलब्ध कुशल मनुष्यबळ व पोषक वातावरणाचा अभ्यास करून कोल्हापूरची निवड केली. त्याच्या उद्योगामुळे कोल्हापूरची प्रिटिंग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगात वेगळी ओळख तयार झाली. मनुग्राफ इंडिया कंपनीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या न्यूजपेपर प्रिंटिंग मशीन उत्पादन क्षेत्रात दबदबा निर्माण केला. त्यांच्या निधनाने कोल्हापुरातील औद्योगिक क्षेत्रात हळहळ व्यक्त झाली. मनुग्राफ कर्मचाऱ्यांत दुःखाची छाया पसरली