‘गडहिंग्लज’च्या स्नेहालयने जागविली ‘माणुसकी’!
By admin | Published: January 19, 2016 11:26 PM2016-01-19T23:26:15+5:302016-01-19T23:38:06+5:30
शिक्षणासाठी मदत : अवघ्या १०० रुपयांच्या वर्गणीतून केली ४५ हजारांची मदत -- गूड न्यूज
राम मगदूम -- गडहिंग्लज --समाजातील अनाथ, गरजू व्यक्ती आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्याच्या उद्देशाने वर्षापूर्वी ‘गडहिंग्लज’मध्ये ‘स्नेहालय’ ही संस्था स्थापना झाली. केवळ सात सभासदांवर सुरू झालेल्या संस्थेची सभासद संख्या आता १२५ वर पोहोचली आहे. ‘माणुसकी’चा जागर मांडलेल्या या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून वर्षभरात गरजवंतांना तब्बल ४५ हजारांची मदत केली आहे.कोल्हापूरच्या ‘प्रतिज्ञा’ संस्थेच्या कामातून प्रेरणा घेऊन एक वर्षापूर्वी उदय तौकरी, प्रदीप साबळे आणि सहकाऱ्यांनी ही संस्था स्थापना केली. सुरुवातीला सात सभासद होेते. आता विविध स्तरांतील सुमारे १२५ व्यक्ती स्नेहालय’च्या माध्यमातून एकत्र आल्या आहेत. दर महिन्याला प्रत्येकी शंभर रुपयांची वर्गणी काढून समाजातील गरजू लोकांना मदत केली जाते. सध्या या संस्थेतर्फे गडहिंग्लजमधील तीन गरीब कुटुंबांना दरमहा ७०० रुपयांचा शिधा, एका वृद्धासह एका वयोवृद्ध दाम्पत्याला दररोज दोन वेळचे जेवण दिले जाते. सहा गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एका महिलेसह दोन गरजूंना औषधोपचारास आर्थिक मदत केली आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या गरीब मुला-मुलींच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांना हवी आहे, रद्दीच्या रूपातील मदत. रद्दी विक्रीच्या रकमेतूनच ‘त्या’ मुलांच्या शिक्षणासाठी भरीव मदत उभी करण्याचा त्यांचा मानस आहे. यातून नव्या दृष्टीचा, नव्या विचारांचा, ‘नवभारताचा शिल्पकार’ घडविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
वर्षात ४५ हजारांची मदत--‘स्नेहालय’तर्फे सध्या तीन कुटुंबांना दरमहा ७०० रुपयांचा शिधा, तीन वयोवृद्धांना दररोज दोन वेळचे जेवण दिले जाते. एका महिलेसह सहा गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, तर दोघांना औषधोपचारांसाठी आर्थिक मदत अशी एकूण एका वर्षात तब्बल ४५ हजारांची मदत करण्यात आली आहे.
शिक्षणासाठी हवीय रद्दी
चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण होणाऱ्या गरीब मुला-मुलींच्या पुढील शिक्षणाच्या खर्चासाठी ‘रद्दीतून निधी’ जमविण्याचा संस्थेचा संकल्प आहे. त्यासाठी जुनी रद्दी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.