‘माणुसकी’च्या दातृत्वाने गहिवरल्या ‘भिंती’

By admin | Published: October 28, 2016 11:47 PM2016-10-28T23:47:37+5:302016-10-28T23:47:37+5:30

देणाऱ्यांचे हात हजारो : दुसऱ्या दिवशीही करवीरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अनेकांच्या चेहऱ्यावर कपडे मिळाल्याचा आनंद

'Manusaki' granddaughter 'wall' | ‘माणुसकी’च्या दातृत्वाने गहिवरल्या ‘भिंती’

‘माणुसकी’च्या दातृत्वाने गहिवरल्या ‘भिंती’

Next

कोल्हापूर : एका दिलाची व एका विचाराची माणसे एकत्र येऊन चांगला उपक्रम राबवू शकतात, हे ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाने सिद्ध केले आहे. सामाजिक दायित्व हरवत चाललेल्या या काळात अजूनही काही चांगल्या मनाची व सामाजिक भान असलेली माणसे आहेत, याची साक्ष पटवून देत शहरातील सीपीआर चौक, कसबा गेट परिसरातील भिंती ‘माणुसकी’च्या दातृत्वाने गहिवरल्या.
शहरातील या उपक्रमाला करवीरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जुने-नवे कपडे, ड्रेस, स्वेटर्स, ब्लेझर्स, पॅँट्स, कुर्ते, जीन्स, लहान मुलांचे कपडे, साड्या, कानटोपी, स्कार्फ, शूज, मोजे, चप्पल, स्लिपर्स ‘माणुसकीच्या भिंती’वर आणून ठेवल्या. गुरुवार (दि. २७) पासून सुरू असलेल्या या उपक्रमात ‘देणाऱ्याचे हात हजारो’ याची प्रचिती येत आहे. हजारो कपड्यांचे जोड या ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आणून दिले आहेत. सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत अनेकजण इथून कपडे घेऊनही जात आहेत.
या ठिकाणी गरजू, गरीब लोकांना आपल्याला हवे ते कपडे, हवे तितके घेऊन जाण्याची मुभा असल्याने गर्दी होत आहे. आपल्यासह आपल्या कुटुंबीयांसाठी कपडे घेऊन जाण्यासाठी अनेक ांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मनाजोगे कपडे मिळाल्याच्या आनंदाने त्यांचे चेहरे खुलत आहेत. फक्त जुनेच कपडे न देता अनेक दानशूर नागरिकांनी नवे कपडेदेखील या उपक्रमासाठी दान केले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान व आनंद पाहणे हा खूप आल्हाददायक क्षण असल्याचे मत या उपक्रमात सहभाग घेणाऱ्यांनी व्यक्त केले.
कसबा गेट येथे कसबा तरुण मंडळ, कॉर्नर मित्रमंडळाचे कार्यकर्ते तसेच ‘स्वाभिमान’चे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर यांनीही ‘माणुसकीची भिंत’ उभारली आहे. या ठिकाणीही दातृत्वाचे अनेक हात समोर आले असून, ड्रेस, खेळणी, शूज, साड्या, जीन्स, आबालवृद्धांसाठीचे कपड्यांचे ढीग लागले आहेत. या उपक्रमासाठी प्रशांत पाटील, महेश कोठावळे, रसिक पेटकर, शिवानंद तोडकर, उदय नार्वेकर, राजन डोंगरसाने, अभिजित तोडकर, गायत्री राऊत, रवींद्र पेटकर हे स्वयंसेवक म्हणून काम पाहत आहेत. हा उपक्रम मंगळवार (दि. १) पर्यंत सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)


आपले योगदान अमूल्य आहे
आपल्या घरी अनेक वस्तू, कपडे जे आपण वापरत नसतो; किंबहुना वाढत्या वयाप्रमाणे त्याची मापे बदलतात, असे ड्रेस, कपडे पडून राहतात. लहान मुलांची खेळणी, वस्तूही अशाच मुले मोठी झाली की अडगळीत टाकल्या जातात. अशा वस्तू, कपडे आपण या ‘माणुसकीच्या भिंती’वर आणून दिल्यास आनंदाच्या क्षणापासून वंचित असलेल्या गोरगरिबांच्या मुलांना त्या उपयोगी पडतील. इतके योगदान आपण नक्कीच देऊ शकतो.

Web Title: 'Manusaki' granddaughter 'wall'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.