‘सम्राट’चा अंधकार दूर सारण्यासाठी धावले अनेक देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 01:05 AM2018-05-07T01:05:04+5:302018-05-07T01:05:04+5:30

Many angels ran away to clear the emperor's darkness | ‘सम्राट’चा अंधकार दूर सारण्यासाठी धावले अनेक देवदूत

‘सम्राट’चा अंधकार दूर सारण्यासाठी धावले अनेक देवदूत

Next



भारत चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केवळ आर्थिक परिस्थिती चांगली नाही या कारणास्तव वैद्यकीय उपचारांचे मार्ग बंद झालेल्या सम्राट युवराज पोळ या चारवर्षीय अंध बालकाला दृष्टी मिळवून देण्याकरिता रविवारी अनेक देवदूत धावून आले. ‘सम्राट’वर ओढावलेल्या अंधत्वावर आणि त्याच्या उपचारात होत असलेल्या हयगयीबद्दल रविवारच्या अंकात ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला तेव्हा समाजातील संवेदनशील मनाच्या अनेक व्यक्तींच्या हृदयाला पाझर फुटलाच शिवाय कशाप्रकारे मदत करायची सांगा, असे आवाहन करणारे फोन ‘लोकमत’ कार्यालयात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘सम्राट’वरील उपचारांची सर्व जबाबदारी स्वीकारली.
अंबाबाई मंदिर परिसरात भिक्षा मागणाऱ्या मंगल पोळ व तिचा दृष्टिहीन झालेला नातू सम्राटची व्यथा ‘लोकमत’च्या रविवारच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. उपचारांकरिता पैसे नाहीत या कारणास्तव पोळ यांनी आशा सोडून दिली होती. पाच-दहा हजारसुद्धा डोंगराएवढी रक्कम वाटणाºया या कुटुंबाने सारे काही ‘देवा’वर सोपविले होते. ही बातमी वाचून अनेकांच्या हृदयाला पाझर फुटला. ‘आम्ही मदत करायला तयार आहोत, फक्त कशा प्रकारे मदत करू सांगा’ असे सांगत गरीब पोळ कुटुंबीयांच्या घरात आशेचा किरण प्रज्वलित केला.
रविवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापुरात होते. सम्राटची बातमी वाचताच त्यांचेही मन अस्वस्थ झाले. त्यांनी तत्काळ भाजपचे कार्यकर्ते विजय जाधव, अनिल पाटील यांना पोळ यांच्या घरी जाऊन चौकशी करून येण्यास सांगितले. एवढेच नाही तर हैदराबाद, चेन्नई येथील अत्याधुनिक( पान १ वरुन) हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचार करावे लागले तर ते करू आणि येणारा सर्व खर्च आपण स्वत: करू, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. पालकमंत्री पाटील यांचा हा निरोप जेव्हा पोळ कुटुंबीयांना सांगण्यात आला तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. खरंच आमच्या मदतीला ‘देवदूत’ धावून आला, अशी सहज प्रतिक्रिया वयोवृद्ध मंगल यांच्या तोंडून बाहेर पडली. पोळ यांची परिस्थिती, सम्राटची अवस्था पाहून विजय जाधव व अनिल पाटील यांचेही मन गहिवरून आले.
आज वैद्यकीय तपासण्या होणार
पालकमंत्री पाटील यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार आज, सोमवारी कोल्हापुरातील एक ज्येष्ठ व अनुभवी नेत्रतज्ज्ञांकडे सम्राटच्या डोळ्यांवरील वैद्यकीय तपासण्या केल्या जाणार आहेत. या तपासण्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावरील उपचाराची दिशा ठरविली जाणार आहे. भाजपचे कार्यकर्ते या तपासणीवेळी उपस्थित राहणार आहेत. चेन्नई आणि हैदराबाद येथे डोळ्यांवर उपचार करणारी जागतिक दर्जाची अत्याधुनिक रुग्णालये आहेत. या रुग्णालयांत सम्राटला न्यायचे का, हे तपासण्या पूर्ण झाल्यावर ठरणार आहे.
देवदूतांची बनली यादीच
सम्राटला दृष्टी मिळवून देण्याचा प्रयत्न म्हणून प्रसिद्ध झालेली बातमी पाहून अनेकांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे फोनवर संपर्क साधून आम्हाला मदत करायची आहे, असे सांगितले. मुख्याध्यापक आर. बी. पाटील (आर. के. नगर), शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते दीपक येसार्डेकर (डोर्ले कॉर्नर), माजी नगरसेवक रमेश पुरेकर, एन.एस.यु.आय. जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे, पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष आसीफ मोकाशी, विजय पाटील, प्रत्यय नाट्यसंस्थेचे प्रशांत जोशी, नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी आमच्यापरीने आम्ही मदत करायला तयार आहोत, असे सांगितले. एक व्यक्तीने आपले नाव न सांगता दोन-तीन लाख रुपयांपर्यंत खर्च येणार असेल तर तो आपण करण्यास तयार आहोत, असे सांगत त्यांनी त्यांचा फोन नंबर दिला. निवास चौगुले यांनी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ तात्याराव लहाने यांच्यामार्फत मोफत उपचार करून देण्याची तयारी दर्शविली.
‘लोकमत’चे कौतुक
निरागस, कोवळ्या ‘सम्राट’ची व्यथा बातमीच्या स्वरूपात मांडल्याबद्दल काही वाचकांनी ‘लोकमत’चे कौतुक केले. बातमी वाचून अतिशय वाईट वाटले, मन गहिवरून आले, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. ‘लोकमत’ने वेगळ्या विषयावर प्रकाशझोत टाकून गरजू, गरीब कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अशाच घटनांना प्राधान्य द्यावे आणि उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहनही वाचकांनी केले.

Web Title: Many angels ran away to clear the emperor's darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.