क्रिकेटच्या सट्टेबाजीतून अनेकजण बनले ‘सम्राट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:17 AM2018-04-26T00:17:09+5:302018-04-26T00:17:09+5:30

Many cricketers betrayed 'emperor' | क्रिकेटच्या सट्टेबाजीतून अनेकजण बनले ‘सम्राट’

क्रिकेटच्या सट्टेबाजीतून अनेकजण बनले ‘सम्राट’

googlenewsNext

एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : क्रिकेट बेटिंगच्या सट्टाबाजाराचे प्रमुख केंद्र म्हणून अलीकडे शहरातील शिवाजी पेठ, राजारामपुरी, ताराबाई पार्क, गांधीनगर हा परिसर आणि इचलकरंजी शहरांची ओळख वाढू लागली आहे. या केंद्रामधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. बेटिंगमध्ये मटका व्यवसायामध्ये ‘सम्राट’ झालेल्या अनेक राजकीय बड्या धेंड्यांचा समावेश आहे. त्यांचे थेट मुंबईपर्यंत सट्टाबाजाराचे कनेक्शन असून, मोबाईलवरून बेटिंग घेण्यासाठी शहरासह उपनगरांत पंटर पेरले
आहेत.
कोल्हापूर शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टाबाजार सुरू असल्याचे शाहूपुरीतील कारवाईने स्पष्ट झाले आहे. या सट्टाबाजाराचे मूळ उखडून टाकण्यासाठी पोलिसांच्या गोपनीय हालचाली सुरू आहेत. क्रिकेट सट्ट्याचे मुख्य केंद्र शिवाजी पेठ, राजारामपुरी, ताराबाई पार्क, गांधीनगरसह इचलकरंजी शहरात आहे. येथून थेट मुंबई असे बेटिंगचे कनेक्शन आहे. क्रिकेट बेटिंगमध्ये सट्टा खेळण्यासाठी काही बड्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. हे व्यापारी घरी बसून एजंटांद्वारे मोबाईलवरून सट्टा लावीत असतात. येथील पंटरांचा मुंबईतील बुकीमालकांशी थेट संपर्क असल्याने शिवाजी पेठ, राजारामपुरी, ताराबाई पार्क, गांधीनगर, इचलकरंजी केंद्रातून बेटिंगची सूत्रे हलविली जात आहेत. पोलीस रेकॉर्डवरील पंटर शहरासह उपनगरांत विखुरलेले आहेत. शहरातील अनेक बडी धेंडे मटका, जुगारातून ‘सम्राट’ बनली आहेत. काही पोलीस अधिकारी, कर्मचाºयांशी सलगी वाढवून त्यांनी आपल्या व्यवसायाचा चांगलाच जम बसविला आहे. पोलिसांनी या बड्या धेंडांच्या मुसक्या आवळल्या, तरच सट्टाबाजारासह अवैध धंदे पूर्णत: बंद होणार आहेत.
क्राईम ब्रँच कारवाई करणार का?
क्रिकेट बेटिंगच्या सट्टाबाजारातील बड्या धेंडांची नावे पोलिसांना माहिती आहेत. राजकीय वरदहस्तामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस कोणी करीत नाही. सट्टाबाजाराची पाळेमुळे उखडून टाकण्याची जबाबदारी क्राईम ब्रँचकडे आहे. या पथकातील प्रमुखांसह
सहकारी या बड्या धेंडांच्या मुसक्या आवळण्याचे
धाडस करणार का? अशी चर्चा नागरिकांत आहे.
बारा कोटींची उलाढाल
आयपीएल क्रिकेट बेटिंगचे कोल्हापूर, पुणे, नागपूर, गुजरात, मुंबई ते दुबई असे कनेक्शन आहे. कोल्हापूर शहर, गांधीनगर व इचलकरंजी येथून सुमारे १२ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची पोलीस दलात चर्चा आहे.
हॉटेल, लॉजची झाडाझडती
क्रिकेट सट्टा जोमाने सुरू असल्याची चाहुल लागल्याने पोलिसांनी कमालीची दक्षता घेतली आहे. पैशांची लूट होऊ नये, गैरकृत्यांना आळा बसावा, यासाठी पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार गुन्हे शाखेचे पोलीस प्रत्येक पंटरांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. हद्दीनुसार लॉज, हॉटेलसह काही अपार्टमेंटची झाडाझडती सुरू आहे.
आयपीएल क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर पैशांची लूट होऊ नये, गैरकृत्यांना आळा बसावा, यासाठी पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार लॉज, हॉटेलसह काही अपार्टमेंटची झाडाझडती घेण्याच्या सूचना निरीक्षकांना दिल्या आहेत.
- संजय मोहिते, पोलीस अधीक्षक

Web Title: Many cricketers betrayed 'emperor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.