Kolhapur Crime: दारू तस्करी, अटकेतील ढेरे याचे अनेक कारनामे, तपासासाठी स्वतंत्र पथक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 12:13 IST2025-03-25T12:12:41+5:302025-03-25T12:13:02+5:30
सोशल मीडियात अधिकाऱ्यांसोबत फोटो

Kolhapur Crime: दारू तस्करी, अटकेतील ढेरे याचे अनेक कारनामे, तपासासाठी स्वतंत्र पथक
कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी असल्याचे भासवून अंबर दिव्याच्या कारमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा नितीन दिलीप ढेरे (वय ३३, रा. जाधववाडी, कोल्हापूर) याचे अनेक कारनामे समोर येत आहेत. सोशल मीडियात त्याचे उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांसोबत अनेक फोटो आहेत.
त्याने काही अधिकाऱ्यांसाठी दारू विक्रेत्यांकडून वसुलीचे काम केल्याची चर्चा आहे. दरम्यान, त्याच्यासह दुसरा संशयित आरोपी शिवाजी आनंदा धायगुडे (५७, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
तस्करीतील कारच्या फास्टॅगवर काळा कागद लावला होता. याचा अर्थ त्याने टोल टाळण्यासाठी शासकीय कर्मचारी असल्याचे बनावट ओळखपत्र तयार केल्याचा संशय आहे. गोव्यातून आणलेला अडीच लाखांचा दारूसाठा तो सैन्य दलातील निवृत्त जवान शिवाजी धायगुडे यांना देणार होता. नेसरी ते गडहिंग्लज मार्गावर महागाव येथे धायगुडे यांच्या कारमध्ये दारूचे बॉक्स भरण्यापूर्वीच तो भरारी पथकाच्या हाती लागला.
कारवाईची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी त्याची कार रस्त्यावरून खाली घसरून झुडपात अडकल्याने कारच्या काचा फुटल्या. त्याने काही अधिकाऱ्यांसाठी पंटर म्हणून काम केल्याची चर्चा आहे. कोरोना काळात त्याने जाधववाडी आणि विक्रमनगर येथे लाखो रुपयांची दारू विकली होती. त्याच्या चौकशीसाठी स्वतंत्र पथक तयार केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मित्राची कार भाड्याने घेतली
ढेरे याने दारू तस्करीसाठी सचिन डकरे (रा. जाधववाडी) याची आलिशान कार भाड्याने घेतली होती. दुसरी कार अटकेतील शिवाजी धायगुडे याच्या मालकीची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन दिवसांत काय तपास झाला?
संशयितांना अटक केल्यापासून दोन दिवसांचा अवधी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मिळाला. या काळात केवळ संशयितांकडील वाहनांची माहिती काढण्यात अधिकाऱ्यांना यश आले. दारूसाठा कोणाला पोहाेचवायचा होता?, तो कोणाकडून आणला? ढेरे याने शासकीय गणवेश कोणाकडून घेतला? अंबर दिवा कोणाकडे मिळाला? तो गेल्या दोन दिवसांपासून मोबाइलवरून कोणाच्या संपर्कात होता? याची माहिती अद्याप अधिकाऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे तपासाच्या गतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षभरातील कारवाया
- एकूण गुन्हे - २२५७
- अटक आरोपी - २१५२
- वाहने जप्त - १६९
- देशी दारू - ४ हजार २२१ लिटर
- हातभट्टी - ३७ हजार ६९ लिटर
- विदेशी दारू - १४ हजार १८८ लिटर
- जप्त मुद्देमालाची किंमत - ६ कोटी २० लाख ६५ हजार ७३४ रुपये
- जप्त वाहनांची किंमत - २ कोटी ३२ लाख २६ हजार २१० रुपये