मुकबधीर महिलेने हंबरडा फोडताच डॉक्टरांसह अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 09:51 AM2021-07-16T09:51:16+5:302021-07-16T10:03:44+5:30

कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर अंत्यसंस्काराचे काम या फाऊंडेशनकडून केले जात आहे. आतापर्यंत त्यांनी ३०० हून अधिक मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.

Many, including doctors, burst into tears as the deaf woman burst into tears | मुकबधीर महिलेने हंबरडा फोडताच डॉक्टरांसह अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला

मुकबधीर महिलेने हंबरडा फोडताच डॉक्टरांसह अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला

Next
ठळक मुद्देमूकबधीर मुलीने हावभाव करत फोडलेला हंबरडा आमच्याही अश्रूंचा बांध फोडून गेला अशा भावना भवानी फौंडेशनचे हर्षल सुर्वे आणि प्रिया पाटील यांनी व्यक्त केल्या.

विश्वास पाटील

कोल्हापूर : अनेक दिवस अंत्यसंस्काराचे काम करत असताना बरेच लोकांचे अश्रू पुसले, पण आमच्या डोळयातून कधी अश्रू आले नव्हते. पण गुरुवारी रात्री आमच्या पण अश्रूंनी वाट मोकळी केली. एक गरीब महिला आणि तिची मुकबधीर मुलगी, ना भाऊ ना बहीण, ना कोणी नातेवाईक, आज त्या आशा हमरे या वृद्ध महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला.. त्यांच्या मूकबधीर मुलीने हावभाव करत फोडलेला हंबरडा आमच्याही अश्रूंचा बांध फोडून गेला अशा भावना भवानी फौंडेशनचे हर्षल सुर्वे आणि प्रिया पाटील यांनी व्यक्त केल्या.

कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर अंत्यसंस्काराचे काम या फाऊंडेशनकडून केले जात आहे. आतापर्यंत त्यांनी ३०० हून अधिक मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. पण कालचा प्रसंग त्यांच्याही डोळ्यात पाणी आणणारा होता.. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना संवेदनशील आणि डोळ्यांच्या कडा पाणवणाऱ्या होत्या.

'मी घरीच जात होतो इतक्यात सीपीआर रुग्णालयाच्या डॉ. वेंकटेश पवार यांचा कॉल आला.  हर्षलजी एक महिला आहेत त्यांचे अंत्यसंस्कार तुम्हालाच करावे लागतील त्यांची मुलगी आहे पण मुकबधीर आहे... क्षणाचाही विचार न करता गाडी वळवली आणि रुग्णालयात पोहोचलो. फाऊंडेशनच्या कार्यकर्त्या प्रिया पाटील सोबतच होत्या. आम्हीच सही करून मृतदेह ताब्यात घेतला. अजूनही दोन मृतदेह होते ते पण घेतले, गाडी घेऊन जाणार  इतक्यात डॉ तेजस्वीनी यांचा फोन आला. आशा हमरे यांचा मृतदेह घेऊन गेला का..? गेला नसेल तर थांबा... त्यांची मुलगी इथेच आहे मी त्यांना घेऊन येते अंत्यदर्शन करूया.. ती मुलगी आली. तिला बोलता येत नव्हते की ती जे हावभाव करत होती ते आम्हाला काही समजत नव्हते. जात कोणती धर्म कोणता, फक्त गंभीर चेहरा अन् कपाळाचा कुंकवाकडे हात करून सांगत होती माझी आई कुठे आहे. कोणी तरी रुग्णाचे नातेवाईक महिला, एक तृत्तीयपंथी महिला आणि प्रिया पाटील यांनी तिला सांभाळले आणि गाडी जवळ घेऊन आले. गाडीचा दरवाजा उघडताच तिने हंबरडा फुटला... होय, हीच माझी आई आहे, नमस्कार करून तिला बाजूला घेतले.

पण अजून कोण तरी एक नातेवाईक येत आहे असे समजले. ते सुद्धा आले मग समजले, त्या मृत महिला ज्या ठिकाणी काम करत होत्या त्यांचे घरमालक आणि मालकीण होते. त्यांनीच त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले होते, त्यांनी सुद्धा अंत्यदर्शन घेतले. स्मशानभूमीत गेल्यावर अंत्यसंकारावेळी ओळखीच्या आणखी एका महिलेचा मृतदेह तिकडे आला होता. ते दोन साडया घेऊन आले होते. प्रियाने त्यांना विनंती करून एक साडी आशा हामरे यांना नेसवू का अशी विनंती केली. त्यांनी लगेच परवानगी दिली आणि त्यांना साडी नेसवून मी आणि प्रियाने गुरुवारी रात्री 10.15 ला अग्नी दिला....
गेल्या दोन महिन्यात आम्ही छातीवर दगड ठेवून कित्येक अंत्यसंस्कार केले..त्यावेळी भावनांना आवर घातला पण आज त्या आम्ही रोखू शकलो नाही. त्या मुकबधीर महिलेच्या फुटलेल्या हंबरडयाने उपस्थित त्या डॉक्टर आणि सर्वच लोकांना अश्रू अनावर झाले. आता आमच्यापुढे प्रश्न आहे तो त्या महिलेला आधार कोण देणार....? आज शुक्रवारी सकाळी त्या मुकबधीर महिलेची व्यवस्था करणे हेच मुख्य काम आहे.'
 

Web Title: Many, including doctors, burst into tears as the deaf woman burst into tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.