इचलकरंजीतील अनेक संस्था जपताहेत वनसंवर्धनाचे व्रत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:21+5:302021-07-23T04:15:21+5:30
शहरीकरण, औद्योगिकीकरण, लोकसंख्या विस्फोट, वाढत्या मानवी गरजा, रेल्वे मार्ग, नवीन रस्ते महामार्ग, वनक्षेत्रावरील अतिक्रमणे, तसेच अन्य काही विकास प्रकल्पामुळे ...
शहरीकरण, औद्योगिकीकरण, लोकसंख्या विस्फोट, वाढत्या मानवी गरजा, रेल्वे मार्ग, नवीन रस्ते महामार्ग, वनक्षेत्रावरील अतिक्रमणे, तसेच अन्य काही विकास प्रकल्पामुळे दिवसेंदिवस वनसंपदेचा ऱ्हास होत आहे. विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याने अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. याचे परिणाम समोर येत असून, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावत आहेत.
आजच्या काळात पर्यावरण समतोल राखायचा असेल, तर वृक्ष लागवड आणि वनसंवर्धन करून पर्यावरणाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. याची गरज ओळखून व्हिजन इचलकरंजी, ग्रीन इचलकरंजी, दोस्ती दिल से दिल तक, तेजोनिधी सेवा कार्य, नेचर फ्रेंड्स फाउंडेशन, कर्तव्यदक्ष सेना या पर्यावरण ग्रुपप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. स्वश्रमातून व स्वखर्चातून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी धडपड सुरू आहे. वाढदिवस, वर्धापन दिन यासह अन्य कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले जात आहे.
चौकटी :
कोरोनामुळे वृक्षांचे महत्त्व अधोरेखित
सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. ॲाक्सिजनची कमतरता अनेक रुग्णांच्या मृत्यूचे कारण बनत आहे. पृथ्वीवर ऑक्सिजनचा चांगला आणि एकमेव स्त्रोत म्हणजे वृक्ष आहेत. कोरोना काळात नागरिकांना ऑक्सिजनचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले आहे. त्यामुळे वृक्ष मनुष्याच्या आयुष्यात किती महत्त्वाची भूमिका पार पाडतात. याची जाणीव कोरोनामुळे अधिक अधोरेखित झाली आहे.
वस्त्रनगरी होणार हिरवीगार
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या व्हिजन इचलकरंजी या संघटनेतर्फे ग्रीन सिटीअंतर्गत थोरात चौक येथील मार्केटमध्ये ३५० वृक्षांची लागवड केली जाणार आहे. वृक्ष दत्तक देण्याची अनोखी मोहीम राबविली जात आहे. तसेच ग्रीन इचलकरंजी ग्रुपच्या तरुणांनी नगरपालिकेच्या शाळांच्या परिसरात मोकळ्या जागी वृक्षारोपण करणार आहेत. त्यामुळे शाळा परिसरात वृक्षांनी भरगच्च दिसणार आहे. दोस्ती दिल से दिल तक या ग्रुपने अनेक वर्षांपासून वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे. नेचर फ्रेंड्स फाउंडेशनमार्फत एक गुंठ्यात ३०० झाडे लावली जणार आहेत. शहरातील अनेक संस्था व संघटनाकडून विविध भागात वृक्षारोपण सुरू आहे. त्यामुळे येत्या काही काळात इचलकरंजी शहराचे रूपडे पालटणार असून, वस्त्रनगरी हिरवीगार होणार आहे.