मंत्रिपदासाठी शिंदेसेनेत सर्वाधिक रस्सीखेच; हसन मुश्रीफ, अमल महाडिक यांचे मंत्रिपद निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 03:26 PM2024-11-25T15:26:35+5:302024-11-25T15:28:38+5:30

कोल्हापूर : मंत्रिपदासाठी जिल्ह्यातील शिंदेसेनेच्या आमदारांमध्येच मोठी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्येष्ठ आमदार म्हणून हसन मुश्रीफ हे ...

Many people in Shindesena are trying for ministerial post in Kolhapur | मंत्रिपदासाठी शिंदेसेनेत सर्वाधिक रस्सीखेच; हसन मुश्रीफ, अमल महाडिक यांचे मंत्रिपद निश्चित

मंत्रिपदासाठी शिंदेसेनेत सर्वाधिक रस्सीखेच; हसन मुश्रीफ, अमल महाडिक यांचे मंत्रिपद निश्चित

कोल्हापूर : मंत्रिपदासाठी जिल्ह्यातील शिंदेसेनेच्या आमदारांमध्येच मोठी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्येष्ठ आमदार म्हणून हसन मुश्रीफ हे एकमेव निवडून आल्याने त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद आणि जिल्ह्यात भाजपला एक तरी मंत्रिपद देणे आवश्यक असल्याने अमल महाडिक यांचे राज्यमंत्रिपद निश्चित मानले जात आहे. त्यामुळे शिंदेसेनेतून नेमकी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आता यासाठीची मोर्चेंबांधणीही सुरू झाली आहे. आमदार विनय कोरे यांच्या मंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच निर्णय घ्यावा लागणार आहे.

शिंदेसेनेतून जिल्ह्यात राजेश क्षीरसागर एकूण तिसऱ्यांदा, प्रकाश आबिटकर सलग तिसऱ्यांदा आणि चंद्रदीप नरके एकूण तिसऱ्यांदा निवडून आले आहेत, तर राजेंद्र पाटील यड्रावकर हे गतवेळी अपक्ष आणि आता महायुतीच्या पाठिंब्यावर स्थानिक आघाडीतून निवडून आले आहेत. त्यामुळे क्षीरसागर, आबिटकर आणि नरके यांच्यातच मंत्रिपदासाठी मोठी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे.

आबिटकर हे आमदार असताना बंडावेळी शिंदे यांच्यासोबत गेल्याने ते त्यांचे शक्तीस्थळ आहे, तर राजेश क्षीरसागर हे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष असताना त्यांनीही बंडात शिंदे यांना साथ दिल्याने तसेच त्यांनी कोल्हापूरसह आजूबाजूच्या मतदारसंघात, जिल्ह्यात लक्ष घातल्याने मंत्रिपदासाठी त्यांचाही दावा निश्चित मानला जातो. नरके यांना मात्र यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. यड्रावकर हे महाविकास आघाडीच्या पहिल्या अडीच वर्षात राज्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत.

राष्ट्रवादीतून निवडून आलेले जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणजे हसन मुश्रीफ. ते सलग सहाव्यांदा निवडून आले आहेत. गेली २० वर्षे ते अपवाद वगळता मंत्री होते. अल्पसंख्याक चेहरा या नात्याने त्यांना नेहमीच प्राधान्य मिळत राहिले. त्यांचा कामाचाही धडाका मोठा आहे. त्यामुळे त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. २०१४ ते २०१९मध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील अनेक मोठ्या खात्यांचे मंत्री होते.

परंतु, नंतर ते पुण्यात गेले आणि २०१९ला भाजपचा कोल्हापूर जिल्ह्यातून एकही आमदार निवडून आला नाही. यंदा मात्र अमल महाडिक एकूण दुसऱ्यांदा आणि राहुल आवाडे हे पहिल्यांदा भाजपकडून आमदार झाले आहेत. शिवाजीराव पाटील भाजपचेच आहेत. परंतु, तेदेखील पहिल्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला बळ देण्यासाठी अमल महाडिक यांना किमान राज्यमंत्रिपद मिळेल, असे सांगण्यात येते.

चंद्रकांत पाटील यांचे मंत्रिपद निश्चित

२०१४ ते २०१९ या कालावधीत महसूल, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, कृषी, सहकार अशा मातब्बर खात्यांचा अनुभव असलेले चंद्रकांत पाटील हे याआधीच्या मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री म्हणून कार्यरत होते. आताही त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. त्यामुळे ते पुणे येथून निवडून आले असले तरी मूळच्या कोल्हापूरच्या या नेत्याचे मंत्रिपद जिल्ह्याला उपयुक्त ठरणार आहे.

सत्यजीत कदमही मुंबईला रवाना

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेत दाखल झालेले सत्यजीत कदम हे रविवारी मुंबईला रवाना झाले. शिंदेसेनेत प्रवेश करताना त्यांना नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यामुळे आता सत्ता आल्यानंतरच्या हालचाली सुरू असताना कदम यांनी मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक आमदार निवडून आल्यानेही अडचण

भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आल्याने मंत्रिपद देताना पक्षनेतृत्त्वाची अडचण झाली आहे. सर्वांचे समाधान करण्यासाठी आता विविध महामंडळे, समित्यांच्याही याद्या काढल्या जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात तर महायुतीच्या १० आमदारांपैकी ७ जण ज्येष्ठ आहेत. त्यामुळे एका जिल्ह्यात कितीजणांना मंत्रिपदे मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Many people in Shindesena are trying for ministerial post in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.