kdcc bank election : ‘एन. टी.’ ‘ओबीसी’च्या उमेदवारीसाठी अनेकांचे देव पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 04:52 PM2021-12-06T16:52:01+5:302021-12-06T16:52:42+5:30
सहज विजयी होऊ शकणाऱ्या ‘एन.टी.’, ‘ओबीसी’मधून उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले असून, आपआपल्या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी इच्छुकांनी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी इच्छुकांच्या संख्येने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातही आघाडीच्या ताकदीने सहज विजयी होऊ शकणाऱ्या ‘एन.टी.’, ‘ओबीसी’मधून उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले असून, आपआपल्या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी इच्छुकांनी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. या दोन जागा सोडून ‘महिला’ व ‘पतसंस्था’ गटातून उमेदवारी मिळावी म्हणून काहींनी फिल्डिंग लावली आहे.
जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी विविध गटांतून २७५ जण इच्छुक आहेत. विकास संस्था गटातील मतदार मर्यादित आहेत. या गटावर स्थानिक नेत्यांचे वर्चस्व असल्याने येथे उमेदवारीसाठी फारसे कोणी प्रयत्न करत नाही. इतर गटात मात्र आपल्या समर्थकांची वर्णी लागावी यासाठी नेत्यांमध्येच चढाओढ पाहावयास मिळत असल्याने राखीव पाचपैकी चार जागांबाबत शेवटपर्यंत पेच कायम राहणार हे निश्चित आहे.
‘प्रक्रिया व दूध’ संस्था गट -
‘प्रक्रिया’ गटातही अवघे ४४९ मतदार आहेत, तिथेही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच असली तरी येथून खासदार संजय मंडलीक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर प्रतिनिधित्व करत आहेत. या गटावर या दोघांचीही पकड घट्ट आहे. त्यामुळे काहींनी उमेदवारी मागितली असली तरी येथे फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे २१ पैकी १४ जागा गेल्यानंतर ७ जागांवर रस्सीखेच सुरु आहे. दूध, पाणीपुरवठा संस्था गटातून भय्या माने प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचा ‘गोकुळ’ निवडणूुकीत आणि त्यानंतरचा संपर्क चांगला असल्याने त्यांची पकड मजबूत असल्याने या गटातून त्यांची उमेदवारी निश्चित आहे.
पतसंस्था, बँका गट -
पतसंस्था गटातून मागील निवडणूुकीत अनिल पाटील हे विरोधी पॅनेलमधून निवडून आले असले तरी बँकेच्या कामकाजात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे सत्तारुढ गटाचे नेते त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही दिसत आहेत. येथून आमदार प्रकाश आवाडे, अर्जुन आबीटकर, प्रा. जयंत पाटील, विजयसिंह माने, अजित पाटील-परितेकर यांनी मागणी केल्याने नेत्यांसमोर पेच राहू शकतो. ‘दूध व ’ पतसंस्था’ गटात काय होणार हे इच्छुकांनाही माहीती असल्याने त्यांनी इतर गटातूनही तयारी केली आहे.
महिला गटातील दुसऱ्या जागेवर चढाओढ
महिला गटातून निवेदिता माने यांची उमेदवारी निश्चित असून दुसऱ्या जागेसाठी चढाओढ आहे. विद्यमान संचालिका उदयानी साळुंखे यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचबरोबर गगनबावडा विकास संस्था गटातून पालकमंत्री सतेज पाटील यांना बिनविरोध करण्यास मदत करणारे पी. जी. शिंदे यांच्या पत्नी लतिका शिंदे या आता दावेदार मानल्या जात आहेत.
दोन जागा आणि डझनभर दावेदार
खरी रस्सीखेस इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त गटात आहे. इतर मागासवर्गीय मधून विलास गाताडे हे प्रतिनिधित्व करत आहेत, ते प्रकाश आवाडे यांचे समर्थक असले तरी आवाडे यांनी स्वतासाठी उमेदवारी मागितल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे इतर इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. असिफ फरास, सदाशिव चरापले, पी. डी. धुंदरे, राजू काझी आदींचे निकराचे प्रयत्न आहेत. भटक्या विमुक्त गटातून अप्पी पाटील हे बाजूला गेल्याने येथून इच्छुकांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादीकडून आर. के. पोवार, कॉग्रेसकडून बबन रानगे, अशोकराव खोत, ‘स्वाभिमानी’कडून संदीप कारंडे असे तब्बल दोन डझन इच्छुक आहेत. इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती या जागा कॉग्रेसकडे आहेत. मात्र आमदार आवाडे, आमदार विनय काेरे यांच्यासह इतरांना सोबत घ्यायचे म्हटले तर यातील जागा सोडाव्या लागणार आहेत.
राजू आवळेंची उमेदवारी निश्चित
अनुसूचित जाती जमाती गटातून आमदार राजू आवळे हे गेली अनेक वर्षे प्रतिनिधित्व करत आहेत. आघाडीकडून त्यांची उमेदवारी निश्चित आहे.
असे आहे मतदान -
विकास सोसायटी - १८६६
प्रक्रिया संस्था - ४४९
नागरी पतसंस्था, बँका - १२२१
पाणीपुरवठा इतर संस्था - ४१११
एकूण - ७६४७