शाहूवाडीत अनेक शाळा ‘विनाशिक्षक’ : विदारक सत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:41 PM2018-06-20T23:41:04+5:302018-06-20T23:41:04+5:30

शाहूवाडी तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदसंख्येचा समतोल ढासळल्यामुळे जवळपास तीसहून अधिक शून्य शिक्षकी प्राथमिक शाळा ‘विना शिक्षक’ हा मागचा पाठ पुढे गिरवित आहेत.

Many schools in 'Shahuwadi' are 'destructive': Discrete Truth | शाहूवाडीत अनेक शाळा ‘विनाशिक्षक’ : विदारक सत्य

शाहूवाडीत अनेक शाळा ‘विनाशिक्षक’ : विदारक सत्य

Next
ठळक मुद्देरिक्त पदसंख्येचा समतोल ढासळला

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदसंख्येचा समतोल ढासळल्यामुळे जवळपास तीसहून अधिक शून्य शिक्षकी प्राथमिक शाळा ‘विना शिक्षक’ हा मागचा पाठ पुढे गिरवित आहेत. यावरून बालशिक्षण हक्क पायदळी तुडवून सर्व शिक्षा अभियानाचे गोडवे गाणाऱ्या सरकारी यंत्रणेबरोबरच लोकप्रतिनिधींनाही याचे सोयरसुतक उरले नसल्याबद्दल सर्वसामान्य पालकांमधून संतापजनक आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शाहूवाडी तालुक्यात सध्या जिल्हा परिषदेच्या २३ केंद्रांतर्गत २७४ प्राथमिक शाळांमध्ये एकूण ८९० शिक्षकपदे मंजूर आहेत. यापैकी जवळपास तब्बल २५० शिक्षकपदे आजघडीला रिक्त आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुपटीपेक्षा जास्त झाला आहे. यामुळे अनेक शाळांना शिक्षक मिळालेले नाहीत. या वस्तुस्थितीमुळे तालुक्याच्या शिक्षण व्यवस्थेवर अनिश्चिततेचे ढग दाटून आले असून, शिक्षकांच्या रिक्तपदांचा हा असमतोल शिक्षण खात्यातील बदली धोरण आणि प्रशासनाच्या अनागोंदी, मनमानी कारभारामुळे शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजले आहेत .

शाळेत नवीन येणाºया मुलांमध्ये ‘आपली शाळा’ म्हणून गोडी, आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने नवागतांचा प्रवेशोत्सव आनंदी वातावरणात साजरा करण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला धाडले; परंतु शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिमोत्तर दुर्गम व डोंगराळ भागात विभागलेल्या करंजफेण, मांजरे, अणुस्कुरा, येळवण जुगाई, माण, मलकापूर, आंबा, उदगिरी, वारूळ, परळे निनाई, पणुंद्रे, कडवे, शित्तूरवारुण, विरळे, भेडसगांव, आदी केंद्रांतील बहुतांशी शाळेतील शिक्षकांची ८० टक्के पदे आजही रिक्त आहेत. यामध्ये करंजफेण केंद्रातील सावर्डी धनगरवाडा, इजोली, मांजरे केंद्रातील गावडी, धुमकवाडी, कुंभ्याचीवाडी बादेवाडी, गवळीवाडी, बौद्धवाडी (शेबवणे), नवलाईवाडी, अणुस्कुरा केंद्रातील आयरेवाडी, न्हाव्याचीवाडी, चौकेवाडी, बर्की धनगरवाडा, येळवण जुगाई केंद्रातील पारिवणे, गिरगाव, आंबा केंद्रातील मानोली, धाऊडवाडा, चाळणवाडी, गजापूर, विशाळगड केंबुर्णेवाडी, मलकापूर केंद्रातील पिंगळे धनगरवाडा, पणुंद्रे केंद्रातील कोदे, शित्तूरवारुण केंद्रातील क्रांतिनगर, पार्टेवाडी, भिसेवाडी, अंबाईवाडी, खोतवाडा (उखळू), तळीचावाडा आशा एक ना अनेक जिल्हा परिषद शाळेत अद्याप एकही शिक्षक दाखल झालेला नाही.

अशावेळी ‘विना शिक्षक’ शाळेतील नवागतांच्या प्रवेशोत्सवाचे काय? हा प्रश्नही अनुत्तरितच राहतो. याबाबत वरिष्ठस्तरावरून वेगवान हालचाली सुरू झाल्याचे सांगणाºया प्रशासकीय अधिकाºयांनी ‘हे चित्र चार दिवसांत बदलेल’ असा आशावाद व्यक्त करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असला तरी शाहूवाडी तालुक्यातील शिक्षण सेवेबाबत ‘काळ्या पाण्याची’ शिक्षा हा शिक्षक वर्तुळात बळावत असलेला समज प्रशासनाच्या आशावादावर विरजण घालणारा ठरू नये, अशी भीतीही शिक्षण वतुर्ळातून व्यक्त केली जात आहे.

प्रशासकीय यंत्रणेला पदसंख्येची खातरजमा नाही
नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेनंतर तालुक्याच्या नागरी भागात असणाºया १६ ते १७ शाळांमध्ये मंजूर शिक्षकपदांपेक्षा अधिक शिक्षक सेवेत दाखल झाले आहेत.
शिक्षकांच्या हातात बदली आदेश देण्यापूर्वी प्रशासकीय यंत्रणेने पदसंख्येची खातरजमा करण्याचे औदार्य दाखविले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असून, या सगळ्या गोंधळामुळेदेखील दुर्गम आणि डोंगराळ शाळांवर अन्याय झाल्याचे अधोरेखित होत आहे.

Web Title: Many schools in 'Shahuwadi' are 'destructive': Discrete Truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.