नेट परीक्षेत सावळागोंधळ, दिलेल्या पसंती केंद्राऐवजी मिळाले दुसरेच, विद्यार्थ्यांना विनाकारण भुर्दंड
By संदीप आडनाईक | Published: March 7, 2023 11:33 AM2023-03-07T11:33:58+5:302023-03-07T11:34:34+5:30
यूजीसी नेट ही भारतातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते
संदीप आडनाईक
कोल्हापूर : राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) नोंदविलेल्या केंद्राऐवजी दुसरेच केंद्र प्रवेशपत्रावर मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवासाची दगदग सहन करावी लागली. शिवाय धावपळीचा सामना करावा लागलाच आणि भुर्दंड बसला तो वेगळाच. या सावळ्यागोंधळाचा फटका या परीक्षेला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांना बसला.
राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) ही यूजीसी नेट किंवा एनटीए- यूजीसी- नेट म्हणून ओळखले जाते. ही भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक किंवा कनिष्ठ संशोधन फेलोशिप (जेआरएफ) मिळवण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठीची चाचणी आहे. यूजीसी नेट ही भारतातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. विद्यापीठ आणि सरकारी महाविद्यालयांसाठी नेटची पात्रता अनिवार्य आहे.
जुलै २०१८ पर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) नेट परीक्षा घेत होते; परंतु, डिसेंबर २०१८पासून विद्यापीठ अनुदान आयोग ही राष्ट्रीय पात्रता परीक्षा घेते. ही परीक्षा जून आणि डिसेंबर महिन्यात अशी वर्षातून दोनदा घेण्यात येते.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (एनटीए) माध्यमातून यंदा डिसेंबर २०२२ ची ही तिसऱ्या सत्रातील परीक्षा ३ ते ६ मार्च या दरम्यान सुरू आहे. आठ विषयांसाठीचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या संकेतस्थळावर यापूर्वीच उपलब्ध करून दिले आहे. भूगोल आणि मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमसाठी ३ मार्च रोजी, ४ मार्च रोजी वाणिज्य विषयातील तर ५ मार्च रोजी हिंदी, मराठी, कन्नड आणि तमिळ विषयांची परीक्षा पार पडली. आज, ६ मार्च रोजी राज्यशास्त्राची परीक्षा होणार आहे.
या परीक्षांना बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना एजन्सीच्या कार्यपद्धतीचा फटका बसला आहे. कोल्हापुरातील अनेक विद्यार्थी या परीक्षांना बसलेले आहेत. कोल्हापूर हे केंद्र असताना काही विद्यार्थ्यांना दिलेली पसंतीची केंद्रे न मिळता दुसरीच परीक्षा केंद्र मिळाले आहे. याशिवाय संकेतस्थळावरून प्रवेशपत्र मिळवितानाही अडचणी येत आहेत. संकेतस्थळावरील प्रवेशपत्रासाठी दिलेली लिंक ओपन व्हायलाच खूप वेळ लागत आहे. अनेकांना ऐनवेळी प्रवेशपत्र डाउनलोड न झाल्याने परीक्षेलाच मुकावे लागले.
काहींना पुणे तर काहींना मिळाले सावंतवाडीचे केंद्र
कोल्हापूरचे पसंती केंद्र मिळालेले असताना काहींना पुण्याचा तर काहींना सावंतवाडीचे परीक्षा केंद्र प्रवेशपत्रावर छापल्यामुळे अनेकांना त्या केंद्रापर्यंत प्रवास करण्याचा विनाकारण भुर्दंड बसला. विद्यार्थिंनीनाही याचा मोठा फटका बसला. अनेकींना उन्हाळ्यातील हा दगदगीचा प्रवास लहान मूल सोबत घेऊन या केंद्रावर पोहाेचण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही.