एकाच शाळेत एकाच विषयाचे अनेक शिक्षक
By admin | Published: August 29, 2014 11:28 PM2014-08-29T23:28:07+5:302014-08-29T23:40:52+5:30
शिक्षक पदाची प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी, अशी मागणी शिक्षकांसह पालकांतून
कसबा तारळे : कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व उच्च प्राथमिक शाळांत पटसंख्येच्या निकषानुसार विषयशिक्षक प्रक्रिया राबविली आहे; परंतु ती राबविताना प्रत्येक शाळेत वेगवेगळ्या विषयांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्याची गरज असताना, एकाच शाळेत एकाच विषयाच्या अनेक शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे विषय शिक्षक पदाची ही प्रक्रिया पूर्णत: चुकीची असून, ती पुन्हा विचारांती राबवावी, अशी मागणी काही ज्येष्ठ शिक्षकांतून व पालकांतून होत आहे.
दोन आठवड्यांपूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत शिक्षणाचा हक्क (आर.टी.ई.) कायद्यानुसार विषय शिक्षक प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळेसाठी राबविण्यात आली. वस्तुत: विद्यार्थी पटनिश्चितीनुसार एकाच शाळेत सर्व विषयांसाठीही वेगवेगळ्या शिक्षकांची नियुक्ती होणे गरजेचे असताना एकाच शाळेत एकाच विषयाच्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षकांची नियुक्ती झाली आहे.
शिक्षणाचा हक्क (आर.टी.ई.) कायद्याचा वेगळाच अर्थ काढून घाईगडबडीत राबविलेली ही प्रक्रिया पूर्णत: चुकीची आहे. त्याचबरोबर ती सप्टेंबर २०१३-१४ या शैक्षणिक वर्षाचा पट निश्चित करून करावयास हवी असताना तसे न करता सप्टेंबर २०१२-१३ च्या पटावर पदनिश्चिती करून संबंधित शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत.
त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षांत काही शिक्षक अतिरिक्त आहेत, त्यांचे पुन्हा समायोजन कुठे करायचे हासुद्धा गुंता आहे. (वार्ताहर)
ज्या-त्या विषयाचे शिक्षक प्रत्येक शाळेत नेमले तर शाळांची तसेच मुलांची गुणवत्ता वाढण्यास निश्चित मदत होणार असल्याचे काही तज्ज्ञ शिक्षकांचे म्हणणे आहे. या सर्वच बाबींचा गांभीर्याने विचार करून विषय शिक्षक पदाची प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी, अशी मागणी शिक्षकांसह पालकांतून होत आहे.