गुन्हेगारीच्या चक्रव्यूहात अनेक तरुण गुरफटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:57 AM2018-10-06T00:57:57+5:302018-10-06T00:58:01+5:30
अतुल आंबी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कामगारांची लूट, हप्ता वसुली, खंडणी, जागेच्या खरेदी व्यवहारातील हस्तक्षेप त्यातून सुरू झालेली हाणामारी व खुनाचे प्रकार याला त्यावेळचे पोलीस व राज्यकर्तेही तितकेच जबाबदार आहेत. सुरूवातीला किरकोळ स्वरुपात सुरू झालेल्या या गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम झाले असते, तर आज इचलकरंजी क्राईमनगरी बनली नसती. त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी पाठबळ दिले नसते, तर अशा कारनाम्यातून निर्माण झालेले दादा पुढे जावून नेते बनले नसते. असे नेते आता स्वत: गुन्हेगारी कृत्ये करत नसले तरी अनेक फासे आपल्या हातात ठेवून पडद्यामागचे सूत्रधार बनून आहेत.
कमी श्रमात व कमी वेळेत जास्त पैसे मिळवून हवी तशी चैनी करणाऱ्या, तसेच रुबाब मिरविणाºया या गुन्हेगारांकडे बघून अन्य तरुणही त्यांच्याकडे आकर्षित होवू लागले. त्यामुळे गुन्हेगारांची व टोळ्यांची संख्या वाढू लागली. गुन्हेगार वाढल्यानंतर त्यांच्यात वर्चस्व वाद सुरू झाला. या वादातूनच खुनाचे सत्र सुरू झाले. खून का बदला खून, असे अनेक मुडदे पडले. हा दहशतवाद वाढत जावून कामगार व कारखानदार यांच्याकडून सुरू असलेली खंडणी व हप्ता वसुली मोठे उद्योजक व व्यापारी यांच्याकडे वळली. त्यांनाही धमकी देवून खंडणी गोळा करण्याचे काम सुरू झाले.
अनेक खून, मारामाºया करूनही पोलिसांच्या व कायद्याच्या कचाट्यातून सुटून बिनधास्तपणे बाहेर वावरणाºया अशा गुंडांची मोठी दहशत निर्माण झाली. त्यामुळे भीतीने त्यांच्याविरोधात ब्र शब्द काढण्याचेही धाडस कोणी करेनासे झाले. या भीतीला बळी पडून अनेकांनी हप्ता ठरवून घेतला. हे हप्ते गोळा करण्यासाठीही मोठ्या गुन्हेगारांनी आपल्याकडे आकर्षित होवून आलेल्या तरुणांना नेमले. त्यांनाही दादांकडून आलोय, एवढे बोलले की, पैसे मिळतात. हा रूबाब वाटू लागला. त्यामुळे कोठेही, काहीही घडले, तर दादा सोडवितात, अशा वेड्या मानसिकतेत अडकलेल्या १७ ते २२ या वयोगटातील तरुणांचा गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापर सुरू झाला. काही प्रकरणात तक्रारी नोंद झाल्याने असे तरुण गुन्हेगारची पाशात अडकले.
गुन्हेगार कार्यकर्ते कारावासात; दादा नामानिराळेच
फिल्मी स्टाईल, कमी श्रम, अधिक मिळकत याला भुलून गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सहभागी झालेल्या तरुणांच्या आयुष्याची वाट लागली. टोळ्यांमध्ये व पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये अडकल्याने बाहेर पडणे मुश्किल झाले. अशा टोळीयुद्धातून अनेक तरुणांचे खून झाले, तर खून प्रकरणात अटक झालेल्या तरुणांना ऐन उमेदीची वर्षे कारावासात अडकून पडावे लागले आणि त्यांचे दादा मात्र या सर्वांपासून नामानिराळेच राहिले. मोठ्या गुन्हेगारांकडे आकर्षित होवून त्यांच्या पाठीमागून फिरणे, त्यानंतर त्यांची कामे करणे. त्यातून गुन्हेगारी क्षेत्रात अडकत जावून वाट लागलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांची दयनीय अवस्था आहे. काही कुटुंबांत एकुलते असलेले तरुणही या विळख्यात सापडले आहेत.