मापात पाप; ‘साई’ पेट्रोलपंप सील

By admin | Published: July 8, 2017 01:21 AM2017-07-08T01:21:23+5:302017-07-08T01:21:39+5:30

ठाणे पोलिसांची उचगावात कारवाई : पाच लिटरमागे १४० मि.लि.चा फरक; पल्सर कार्डमध्ये बदल

Mape sin; 'Sai' petrol pump seal | मापात पाप; ‘साई’ पेट्रोलपंप सील

मापात पाप; ‘साई’ पेट्रोलपंप सील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर/उचगाव : पेट्रोल व डिझेल पंप मशीनमधील इलेक्ट्रॉनिक पल्सर कार्डमध्ये अवैधरीत्या फेरफार केल्याच्या संशयावरून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने उचगाव (ता. करवीर) येथील गडमुडशिंगी मार्गावरील साई एजन्सीच्या पेट्रोलपंपावर शुक्रवारी रात्री छापा टाकला. यात पल्सर कार्ड जप्त
करून हा पंप सील करण्यात आला. अशा प्रकारची कारवाई जिल्ह्यात प्रथमच झाल्यामुळे पेट्रोल पंपचालकांमध्ये खळबळ माजली.
ठाणे येथील काही पेट्रोल पंपांवरील पेट्रोल व डिझेल सोडल्या जाणाऱ्या मशीनमधील पल्सर कार्ड (इलेक्ट्रॉनिक आयसी) मध्ये फेरफार करून प्रति पाच लिटरमागे १४० ते १६० मि.लि. इतके
पेट्रोल ग्राहकांना कमी सोडले जात होते; तर डिझेलमध्येही पाच लिटरमागे ३० मि.लि. इतकी तूट ग्राहकांना सोसावी लागत होती. याबद्दल आलेल्या तक्रारीवरून ठाणे पोलिसांनी अधिक तपास केला असता, अशा प्रकारे पल्सर कार्ड युनिटमध्ये
फेरफार करणारी टोळी कार्यरत असल्याचे पुढे आले. त्यानुसार प्रथम ठाणे
गुन्हे अन्वेषण विभागाने पुणे येथील दोघाजणांना

अटक केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी करता राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर असे पेट्रोलमध्ये कपात करणारे पल्सर युनिट त्यांनी पुरविल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवारी रात्री गडमुडशिंगी रोडवरील एस्सार कंपनीच्या व साई एजन्सीजच्या पेट्रोल पंपांवर कारवाई करीत तेथील दोन मशीनमधील चार नोझलमधून पेट्रोल सोडले जात होते. त्यातील पल्सर कार्ड युनिट अशा प्रकारे फेरफार केल्याच्या संशयावरून ताब्यात घेतली. हा पंप एका विद्यमान नगरसेवकाचा असल्याची चर्चा या ठिकाणी होत होती; तर पोलीस पथकाने व्यवस्थापक सुंदर शहापुरे येथे काम करीत असल्याचे सांगितले. ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने केली. यात पोलीस निरीक्षक विकास घोडके, उपनिरीक्षक अविनाश महाजन, हवालदार अंकुश भोसले, सुरेश यादव, प्रशांत भुर्के व एस्सार कंपनीचे विक्री प्रतिनिधी अमित भोंगले, स्थानिक वैधमापन निरीक्षक अ. का. महाजन, अ. अ. शिंगाडी, ल. यु. कुटे व जिल्हा पुरवठा कार्यालयाचे निरीक्षक एन. एम. रेवडेकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
गडमुडशिंगी येथील एस्सार कंपनीच्या व साई एजन्सीजच्या मालकीच्या पंपांमधील पल्सर युनिट ताब्यात घेतली आहेत. या युनिटमध्ये फेरफार केल्याचे आढळल्यास पंपमालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात येईल अथवा तपास सुरू असलेल्या या गुन्ह्णात या दोषींनाही आरोपी केली जाईल.
- विकास घोडके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण (ठाणे)


शहरातील सात पंपांवरही होणार कारवाई
ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे अशा प्रकारची पेट्रोल व डिझेल पंप मशीनमधील इलेक्ट्रॉनिक आयसीमध्ये फेरफार केलेले पल्सर कार्ड राज्यातील ४७ हून अधिक पंपामध्ये या टोळीने पुरविल्याची माहिती होती. त्यातील पल्सर कार्ड युनिट कोल्हापुरातील सात पंपांमध्येही बसविण्यात आली आहेत. त्यामुळे या पंपांवर आज, शनिवारीही कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. या पंपांमधील पल्सर युनिटमध्ये सहजासहजी फेरफार करता येत नाहीत. याकरिता खास तंत्रज्ञांची गरज लागते. त्यामुळे सहजासहजी ही युनिट बदलता येत नाहीत. त्यामुळे दोषी पंपचालकांवर कारवाई होणार आहे.

Web Title: Mape sin; 'Sai' petrol pump seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.